टीव्ही अँकर सुहेब इलियासीला जन्मठेप

0

कात्रीने केली होती पत्नी अंजूची हत्या

नवी दिल्ली : इंडियाज मोस्ट वॉन्टेड या प्रसिद्ध टीव्ही शोचा अँकर सुहेब इलियासी याला पत्नीच्या खूनप्रकरणात दिल्लीतील कडकडुमा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 16 डिसेंबरला इलियासीला न्यायालयाने दोषी ठरवले होते. 17 वर्षांपूर्वी 11 जानेवारी 2000 ला सुहेबची पत्नी अंजूचा कात्रीने खून करण्यात आला होता. हुंड्यासाठी पत्नीची हत्या केल्याच्या आरोपावरून 28 मार्चला पोलिसांनी त्याला अटक केली होती.

इंडियाज मोस्ट वॉन्टेड शोचा अँकर
सुहेबने 1995 मध्ये पत्नी अंजूसोबत गुन्हेगारी जगतावर आधारित टीव्ही शो केला होता. मार्च 1998 मध्ये इंडियाज मोस्ट वॉन्टेड या टीव्ही शोमधून सुहेबला प्रसिद्धी मिळाली. 2000 मध्ये अंजू इलियासीच्या हत्येच्या घटनेनंतर हा शो बंद झाला होता.

आत्महत्या केल्याचे सांगितले..
सुहेब आणि अंजूमध्ये सतत वाद होत होता. अंजूचा खून केल्यानंतर सुहेबने तिच्या मैत्रिणीला फोन करून अंजूने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. अंजूची हत्या मयूर विहार अपार्टमेंटमध्ये झाली होती. तपासात पोलिसांना बाथरूमध्ये रक्ताचे डाग आढळले होते. नंतर अंजूच्या कुटुंबीयांनी सुहेबनेच खून केल्याचा आरोप केला होता. अंजूची बहिण रश्मीने या प्रकरणी पोलिसांना एक डायरी दिली होती. या डायरीचा पोलिसांना तपासात उपयोग झाला.