लंडन । टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये डीआरएस पद्धतीचा अवलंब केला जावा, अशी शिफारस भारताचे प्रमुख प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आयसीसीच्या क्रिकेट समितीने केली आहे. सामन्यामध्ये पंचांनी फलंदाजाला पायचीत बाद झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर कोणताही संघ पंचाच्या या निर्णयाविरूद्ध डीआरएस पद्धतीची मागणी करतो. कसोटी क्रिकेटमध्ये या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी विविध देशांकडून सहकार्य अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्यकाळात डीआरएस पद्धतीचा अवलंब महत्त्वाचा ठरेल, असेही या बैठकीमध्ये सांगण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या समितीच्या बैठकीमध्ये विविध सूचना करण्यात आल्या. बैठकीला या समितीचे सदस्य क्लेरी कॉनर, राहुल द्रविड, ग्रिफीथ, महेला जयवर्धने, डेव्हिड केंड्रीक्स, किटलबॉरो, डरेन लिमन, रंजन मदुगुले, टीम मे, केव्हीन ओब्रायन, शॉन पोलॉक, जॉन स्टिफनसन, स्ट्रॉस, डेव्हिड व्हाईट उपस्थित होते.
क्रिकेटमध्येही लाल आणि पिवळे कार्ड?
मैदानावर गंभीर गैरवर्तन करणार्या क्रिकेटपटूला मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार मैदानावरील पंचांना दिले जावे, अशी शिफारस या समितीने केली आहे. फुटबॉल आणि हॉकीच्या सामन्यांदरम्यान खेळ चालू असताना खेळाडूने गैरवर्तन केल्यास त्याला पंच लाल किंवा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले जाते. आता हाच नियम क्रिकेटच्या मैदानावरही दिसण्याची शक्यता आहे. खेळ सुरू असताना गंभीर गैरवर्तन करणार्या खेळाडूला मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार पंचांना देण्याची शिफारस ही वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. गेल्या काही काळात क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंकडून अरेरावी होण्याचे, प्रतिस्पर्धी खेळाडूंशी भिडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंचांना बेशिस्त खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार मिळाल्यास बेशिस्त खेळाडूंना चाप लावणे शक्य होणार आहे.