टी-20 थरार बुधवारपासून

0

कटक । कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकल्यानंतर आता बुधवारपासून सुरू होणारी टी-20 मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्यात श्रीलंकेवर पुन्हा एकदा विजय मिळवून दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ टी-20 मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

जुन्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न
फॉर्मात असलेल्या टीम इंडियाला सत्रात 14 वी मालिका जिंकण्याची संधी आहे. भारताच्या या मोहिमेला येत्या बुधवारपासून सुरुवात होईल. बाराबती स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा रिकार्ड 7-4 असा आहे तसेच गेल्या चार सामन्यात भारतीय संघाने येथे चांगली कामगिरी केली आहे. 2015 मध्ये खेळवण्यात आलेल्या एकमात्र टी-20 सामन्यात भारतीय संघाचा डाव दक्षिण आफ्रिकेविरुध्द 92 धावातच आटोपला होता. त्यानंतर क्रिकेटरसिकांच्या रोषामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे या जुन्या आठवणी पुसण्याची जबाबदारी भारतीय संघावर आहे.

धर्मशाळामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त श्रीलंका संघ आपली छाप पाडू शकलेला नाही. मोहालीमध्ये झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यांत कर्णधार रोहित शर्माच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळविला होता तसेच विशाखापट्टणममध्ये झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यांत श्रीलंकेला पराभूत करत भारतीय संघाने एकदिवसीय मालिका खिशात घातली होती. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतील विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न भारतीय संघ टी-20 मालिकेत करणार आहे, तर श्रीलंकेच्या खेळाडूंसाठी पुन्हा एकदा सत्त्वपरीक्षा आहे.