‘टेक्नोवांझा 2018’ मध्ये गाडगेबाबा अभियांत्रिकीचा डंका

0

नऊ प्रकारात यश मिळवत पटकावले विजेतेपद ; संघाचा गौरव

भुसावळ- श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ब्लांका बोट्झ या संघाने भारतातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी मुंबईच्या व्ही.जे.टी.आय महाविद्यालयाद्वारा आयोजित ‘टेक्नोवांझा 2018’ ह्या तांत्रिक मेळाव्याचे विजेतेपद पटकावून विक्रम घडवला. ह्या तांत्रिक मेळाव्यात 12 तांत्रिक स्पर्धा असतात आणि ह्यातील अधिकाधिक स्पर्धा जिंकणार्‍या संघाला आणि महाविद्यालयाला विजेते म्हणून घोषित केले जाते. ब्लॅका बोट्झ या संघाने ह्यातील 09 स्पर्धा प्रकारात विजय मिळवत महाविद्यालयासाठी कॉलेज कप खेचून आणण्याची नेत्रदीपक कामगिरी केली.

‘बाजीप्रभू’ ठरला सरस
रोबोवॉर प्रकारात 30 किलोग्रॅम वजनी गटात ब्लांका बोट्झची निर्मिती असलेल्या ‘बाजीप्रभू’ ह्या रोबोने ‘आझाद’ ह्या रोबोला मात देत विजेतेपद पटकावले. ‘बाजीप्रभू’ या रोबोने संपूर्ण भारतातील स्पर्धांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. व्ही.आय.टी. वेल्लोर येथील स्पर्धेत या रोबोने सर्वोत्कृष्ठ रोबोचा मान डिस्टक्टिव्ह कॅटेगरीमध्ये पटकावला होता. टेक्नोवांझा 2018 मध्ये बालनाक चिंच स्वनिर्मिती असलेल्या ‘तानाजी’ ह्या रोबो ने 60 किलोग्रॅम वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला. या व्यतिरीक्त ब्लांका बोट्झ या संघाने रोबोटीक्स तंत्रज्ञान प्रकारातील रोबो मेंझ, रोबो स्ट्राईक, रोबो रेस, रोबो सॉकर, रोबो सुमो, क्लाइंब ए रोप आणि एक्वा इव्हेंट ह्या प्रकारात विजेतेपद पटकावून स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळवत मानाच्या कॉलेज कप वॉर नाव कोरले. संघ प्रमुख राहुल इशी याने आणि प्रमुख मार्गदर्शक अक्षय जोशी यांनीही ह्या विजेतेपदाची श्रेय सांघिक कामगिरीला दिले.

यशस्वी संघाचा संस्थेतर्फे गौरव
यशस्वी विद्यार्थ्यांचे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोषाध्यक्ष अ‍ॅड.एम.डी.तिवारी, सत्यनारायण गोड्याले, रमेश नागराणी, प्राचार्य डॉ.आर.पी.सिंग, डीन.डॉ.आर.बी.बारजिभे, इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.एन.एम.खंडारे. प्रा.जे.एस.चौधरी, प्रा.गजानन जाधव यांनी कौतुक केले. भुसावळात ब्लांका बोट्झ या संघाने भारतातील अग्रमानांकित अश्या कॉम्बॅट रोबोटीक्स प्रकारातल्या जवळपास सर्व स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.