लंडन । क्रिकेटपाठोपाठ आता टेनिस खेळाच्या मानुगुटीवरही फिक्सिंगचे भुत बसलेय की काय असे वाटायला लागेल. नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत फिक्सिंगची शक्यता वर्तवली जात आहे. विम्बल्डनच्या तीन सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचं वृत्त आहे. कथित मॅच फिक्सिंगची टेनिस इंटिग्रिटी यूनिटद्वारा (टीआययू) चौकशी केली जाणार आहे. टीआययूने याबाबत घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅमच्या एका सामन्याचीही चौकशी केली जाणार आहे. यापुर्वीही टेनिसमध्ये फिक्सिंग झाल्याचे आरोप झाले होते.
विम्बल्डनमधील त्या तीन सामन्यांपैकी दोन सामने पात्रता फेरीतील आहेत तर एक लढत मुख्य सामन्यांपैकी असल्याचे सांगितले जाते. या सामन्यांची चौकशी टेनिस इंटिग्रिटी यूनिटकडून मॅच अलर्ट पॉलिसीद्वारा केली जाणार आहे. याशिवाय गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅमच्या एका सामन्याचीही चौकशी केली जाणार आहे. टीआययूकडे विम्बल्डनमध्ये फिक्सिंग झाल्याचे अलर्ट आले होते, त्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. फिक्सिंगबाबत मिळालेला एक अलर्ट हा फिक्सिंग झाल्याचा पुरावा होऊ शकत नाही असंही टीआययूने यावेळी स्पष्ट केलं. याशिवाय विम्बल्डनदरम्यान 10 जणांनी घेतलेल्या तडकाफडकी निवृत्तीचा फिक्सिंगसोबत संबंध नसल्याचेही टीआययूने स्पष्ट केलं.
नुकत्याच संपन्न झालेल्या विम्बल्डन ओपनच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद रॉजर फेडररने विजेतेपद पटकावले होेते , तर महिला एकेरीतं मुगुरुजा विजयी ठरली होती. फेडररचं हे कारकिर्दीतील 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. त्याबरोबरच आठ वेळा विम्बल्डनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला टेनिसपटू ठरला आहे. याआधी विल्यम रेनेश़ॉ आणि पीट संप्रास यांनी प्रत्येकी सात वेळा विम्बल्डनच्या विजेतेपदांना गवसणी घातली होती.