टेनिस स्पर्धेसाठी महापालिका देणार वर्षाला एक कोटी

0

पिंपरी-चिंचवड :बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणार्‍या महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पाच वर्षासाठी प्रतिवर्षी एक कोटी रुपये प्रमाणे पाच कोटी रुपये देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी (दि. 20) होणार्‍या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी ठेवला आहे. स्पर्धेचा आणि पिंपरी-चिंचवड शहर किंवा महापालिकेचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही, तरीही पाच वर्षे ही कोट्यवधीची उधळण केली जाणार आहे. सत्तेवर आल्यापासून भाजपाकडून होणार्‍या उधळपट्टीवर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

स्पर्धेचा खर्च 16 कोटी
असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स (एटीपी) या संघटनेतर्फे जगात टेनिस पटुंच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तमिळनाडू, चेन्नई याठिकाणी 20 वर्षांपासून ही संघटना स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेत जगातील सुप्रसिद्ध टेनिसपटू सहभागी होतात. एटीपी संघटना टेनिस स्पर्धा आता चेन्नईत घेण्यात येणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनकडून ही जागतिक स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात घ्यावी, असे सुचविले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना त्याचा फायदा होईल, या विषय विचारात घेऊन पुढील पाच वर्ष महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा बालेवाडीत घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजन, बक्षिसांची रक्कम मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी द्यायची आहे. तर, उर्वरित निधी प्रशासकीय संस्थाकडून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे देखील नाव आहे. या स्पर्धा पाच वर्षांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेला 16 कोटी रुपये खर्च येणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातील अप्पर सचिवांनी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढील पाच वर्षासाठी पाच कोटी रुपये द्यावे, असे पत्र 4 ऑगस्ट रोजी पालिकेला दिले आहे. त्यानुसार पालिका या स्पर्धेला प्रतिवर्षी एक कोटी रुपयांप्रमाणे पाच कोटी रुपये देणार आहे. त्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.