ठाणे । आर्यमन देशपांडेच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर डोंबिवली जिमखान्याने ठाण्याच्या ऑफिसर्स क्लबचा 3-1 असा पराभव करत जिंदाल स्टील- जिंदाल टेबल टेनिस अकादमी आयोजित मिडजेट-कॅडेट मुलांच्या आंतरक्लब टेबल टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या लढतीत मोहीत शेजवळने पहिली लढत जिंकून ऑफिसर्स क्लबला चांगली सुरुवात करुन दिली. सलामीच्या लढतीत त्याने अभिषेक दांडेकरचा 4-1 असा पराभव केला. त्यानंतरच्या लढतींमध्ये आर्यमनने गर्व उतेकरचा 11-3, 11-3, 13-11 असा पराभव केला. या नंतर दुहेरीच्या लढतीत पारिधी अगरवाल आणि अभिषेक दांडेकर या जोडीने मोहित शेजवळ आणि नील जी चा पराभव करत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. अंतिम लढतीत डोंबिवली जिमखान्याचा सामना बुस्टर क्लबशी होईल. ऑफीसर्स क्लब संघाने तिसरा क्रमांक पटकावला.