‘टेमघर’च्या दुरुस्तीला लागणार आणखी 2 वर्ष

0

तज्ज्ञ समितीचा पाहणी दौरा : धरणात 65.60 टक्के पाणीसाठा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम केंद्र शासनाच्या केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन-सीडब्लू अ‍ॅन्ड पीआरएस) या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या धरणाच्या दुरुस्तीसाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच या कामावर देखरेख करणार्‍या तज्ज्ञ समितीचा पाहणी दौरा सप्टेंबरअखेर होणार आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत टेमघर धरणात 2.43 अब्ज घनफुट (टीएमसी) म्हणजे 65.60 टक्के एवढा पाणीसाठा असून हे पाणी पुणे शहर आणि इंदापूरसाठी तसेच सिंचनासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबरपासून पुन्हा धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गळती थांबविण्याचे काम सुरू आहे. परंतु, धरण पूर्णपणे सक्षम करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

भेगांमध्ये भरणार सिमेंट

शहराला पुरेल एवढा पाणीसाठा झाला असल्याने टेमघर धरण रिकामे करून धरणाच्या भेगांमध्ये सिमेंट भरण्याचे काम केले जाणार आहे. तसेच सिमेंटचे प्लास्टर करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत. पाचवी बैठक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या सदस्यांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची पाहणी केली जाणार असून समितीकडून अपेक्षित कामांची माहिती जलसंपदा विभागाला दिली जाणार आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

जानेवारीत पुन्हा दुरुस्ती

धरणाच्या दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राकडून (सीडब्ल्यूपीआरएस) मार्गदर्शन मिळाले आहे. गेल्या वर्षांपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल. त्यासाठी डिसेंबर महिन्यापासून टेमघर धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येईल. दरम्यान, या महिना अखेरीला शासन नियुक्त तज्ज्ञ समितीकडून कामाची पाहणी करण्यात येणार असल्याचे पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.