पुणे : गुंतवणूकदारांकडून पैसे उकळून त्यांना भूखंड देण्याच्या आमिषाने फसविणार्या टेम्पल रोज ग्रूपच्या चौकशीचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट तपास पथकाने अखेर विशेष न्यायालयापुढे सादर केला आहे. या अहवालानुसार, टेम्पल रोजचा प्रमुख देविदास सजनानी याने सुमारे सात हजार 200 गुंतवणूकदारांकडून 412 कोटी रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले असून, 310 रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकारही चव्हाट्यावर आलेला आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी सजनानी यांचा जामीनअर्ज फेटाळून लावत, प्रथमदर्शनी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे दिसून येत आहे असे निरीक्षण नोंदविले आहे.
आठ कंपन्या स्थापन करून गुंतवणूक घेतली!
स्वस्तात भूखंड देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी टेम्पल रोज ग्रूपच्या संचालकांविरुद्ध पुणे, मुंबईत गुन्हे दाखल झालेले आहेत. 25 मेरोजी पुण्यातील चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने करून 19 ऑगस्टरोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यात सजनानी याच्यासह संचालकांनी यापूर्वी 11 ऑगस्टरोजी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, विशेष न्यायालयाने हा जामीनअर्ज फेटाळून लावला होता. याच गुन्हेप्रकरणी पुण्यातील कन्टोमेंट पोलिस ठाणे व मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यातही एफआयआर दाखल झालेले आहेत. त्यात सजनानीसह इतर संचालकांना जामीन मिळालेला आहे. भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. एकावेळी एकाच गुन्ह्यात एकाच ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला हवेत, तेव्हा पुण्यातील गुन्हे हे अवैध आहेत, असा बचाव सजनानी याच्या वकिलांनी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, इतर दोन गुन्ह्यांत जामीन मिळालेला असल्याने पुण्यातील गुन्ह्यातही जामीन द्यावा, अशी विनंतीही सजनानीचे वकील मोनिष जैन यांनी विशेष न्यायाधीशांना केली. त्याला विशेष सरकारी वकील सुनील हांडे तीव्र आक्षेप घेतला. स्पेशल फॉरेन्सिक रिपोर्टच न्यायालयापुढे सादर करून, सजनानी याने आठ बनावट कंपन्या स्थापन करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. गुंतवणूकदारांकडून ठेवी घेऊन हजारो गुंतवणूकदारांना किमान 300 कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याचेही हांडे यांनी न्यायालयास सांगितले.
उच्च न्यायालयातही घेतली धाव
सजनानी याने वेगवेगळ्या नावाने मालमत्ता खरेदी केली व कमिशनपोटी 1.74 कोटी रुपयेही घेतले. त्यामुळे त्याने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. वेगवेगळ्या एफआयआरबद्दल विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात म्हणाले, की आरोपपत्र दाखल झालेले असून, सुनावणीच्यावेळी इतर गुन्ह्यांत आणि या गुन्ह्यांत काय साम्य आहे, याचा विचार न्यायालय नंतर करेल. अॅड. जैन यांचे सहकारी अॅड. गौरव नाशिककर यांनी सांगितले, की याप्रकरणी आपण हेबिअस कार्पोसदेखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून, एकाच गुन्ह्यांत वेगवेगळे एफआयआर नोंदविण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदविलेले आहेत.