टेम्पोवर कार आदळून एकाच कुटुंबातील सहाजण जखमी

0
विरुद्ध दिशेने जाणार्‍या गाडीची दुभाजक तोडून धडक 
तळेगाव दाभाडे : समोरून येणार्‍या टेम्पोला विरुद्ध दिशेने जाणार्‍या मारूती अल्टो कारने रस्ता दुभाजक तोडून धडक दिली. या अपघातात मोटारीतील एकाच कुटुंबातील चारजण गंभीर जखमी झाले तर दोन जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि. 15) सकाळी सव्वासहाच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील सेवाधाम हॉस्पिटलजवळ झाला. दुर्गा आशिष गजभिये (वय 31), प्रणय घनश्याम गजभिये (वय 28), आशिष घनश्याम गजभिये (वय 31), दीक्षा घनश्याम गजभिये (वय 26), अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून घनश्याम गजभिये (वय 60 ) रंजना गजभिये (वय 54) सर्वजण रा. यवतमाळ रोड, बडनेरा, अमरावती हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर सोमाटणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
गजभिये तळेगाव स्टेशमार्गे निघाले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजभिये कुटुंबीय मुंबईवरून एक कार्यक्रम उरकून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने तळेगाव स्टेशन मार्गे निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. पहाटे मॉर्निग वॉकला गेलेले विजय उडगिरी, संतोष पवार, सचिन महाजन, सुरेश ओझरकर यांनी या अपघाताचा आवाज ऐकून तातडीने मोटारीकडे धाव घेतली. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रूग्णालयात दाखल केले.