टेम्पो-कारच्या धडकेत दोन महिला गंभीर जखमी

0

विरार । मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या गुजरात वाहिनीवर शिरसाड महामार्ग पोलीस चौकी व के टी हिल रिसॉर्ट समोर भरधाव 407 टेम्पोने कारला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात कारच्या डिक्कीच्या बाजूने नुकसान झाले असून प्रवास करणार्‍या मंजुळा रघुनाथ माळवी 70 व नंदाबाई भोईर राहणार जांभुळपाडा, भाताणे ता. वसई या महिला जबर जखमी झाल्या आहेत.

यामध्ये मंजुळा या वयस्क महिलेला जास्त मार लागला आहे. दोघींना जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या हायवे रुग्णवाहिकेतून नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात 7 सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला असून टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर टेम्पो दोन रस्त्यांच्या मधल्या डिव्हायडरला ओलांडून अडकला होता. तो तसाच सोडून चालक फरार झाला आहे.