ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने नातेवाईक संतप्त
एरंडोल- भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने समोरून येणार्या टेम्पो ट्रॅव्हल्सला समोरून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात टेम्पोमधील तीन जण ठार झाले तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पातरखेडे गावासमोर असलेल्या आश्रमशाळेजवळ झाला.अपघातात मयत व जखमी झालेले सर्व सदस्य यावल तालुक्यातील मारूळ येथे विवाह समारंभाच्या स्वागत समारंभास जात असतांना रस्त्यावर त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला.
स्वागत समारंभाला जाणार्या वर्हाडींच्या वाहनाला अपघात
याबाबत माहिती अशी की, ठाणे येथील सय्यद व मलिक परीवारातील सदस्य टेम्पो ट्रॅव्हल्स (क्रमांक एम.एच.04 जी.पी.2777) ने मारूळ, ता.यावल येथे मुलीच्या विवाहाच्या स्वागत समारंभासाठी जात होते. मंगळवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास एरंडोल पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पातरखेडे गावाजवळ त्यांच्या वाहनास समोरून येणा-या ट्रक (क्रमांक ओ.आर.15 एम.0739) ने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो मधील आरीफ मेहबूब मलिक (50, रा.शादी महल हॉल समोर, मुंब्रा, ठाणे), फिरोजखान रशीद खान (31, रा.जिलानी हाउस, राबोडी 1 ठाणे) व ताहिरा नजीर सय्यद (50, रा.शाईन अपार्टमेंट, दुसरा मजला, राबोडी 1 ठाणे) हे ठार झाले तर कलीम याकुब मलक (48 रा.साहेजादा अपार्टमेंट, महागीरा ठाणे वेस्ट), स्वालेहा कलीम मलक (43 रा.साहेजादा अपार्टमेंट ठाणे), मकसूदअली सय्यद (44, रा.जिलानी हाउस, ठाणे), निसारअली सय्यद सय्यद (72 रा.जिलानी हाउस, ठाणे), आलमबी शेख (45, रा.जिलानी हाउस, ठाणे) हे पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.