मुंबई । युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या टेरेसवरील उपहारगृह या संकल्पनेला पालिकेने मंजूरी दिल्याने पालिकेतील भाजप तोंडघशी पडला आहे. या प्रस्तावाला कडवा विरोध करणार्या भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना विरोधाची तलवार म्यान करावी लागली आहे. शिवसेनेला वारंवार खिंडीत गाठणार्या भाजपावर मात करण्यात शिवसेनेला यश आले आहे. मनसेतून फूटून सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यापासून पालिकेतील सत्तेचे दावे करणारा भाजप हतबल झाला आहे. टेरेस हॉटेलच्या धोरणाला मंजूरी मिळवून भाजपला सेनेने दुसरा धक्का दिला आहे.
आदित्य यांनी नाईट लाईफ आणि टेरेसवरील उपहारगृहांना मान्यता देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार सन 2014 मध्ये पालिकेने रुफ टॉपची पॉलिसी आणली होती. मात्र भाजप, मनसेने विरोध केल्यामुळे हा प्रस्तावाला सुधार समिती आणि पालिका सभागृहाच्या मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. मुंबईत टेरेसवरील अनेक हॉटेल्स बंद पडली असून हजारो तरूणांचे रोजगार बुडाले असल्याचा दावा सेनेने केला होता. याबाबत प्रशासनाने सुधारित धोरण तयार केले होते. या धोरणाला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गेल्या बुधवारी स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय मंजूरी दिली आणि त्याची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेशही दिले.
प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रस्ताव मंजूर
गटनेत्यांच्या सूचनांचा समावेश करून हे नवीन धोरण तयार करण्यात आले असून आयुक्तांच्या अधिकारात लागू झाले आहे. पालिकेत कोणतेही धोरण सभागृहाच्या मंजुरीशिवाय अंमलात आणता येत नसताना सेनेने राजकीय दबावाचा वापर केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही होता. टेरेसवरील उपहारगृहांना भाजपने पालिकेत विरोध केल्यामुळे हे धोरण मंजुर होऊ शकले नव्हते. दोन वर्षांपूर्वी सुधार समितीत भाजपने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला होता.