पिंपरी-चिंचवड : भावा-बहिणीच्या नात्याला आणखीच दृढ करणारी राखीपौर्णिमा अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. राखीपौर्णिमेसाठी विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी तसेच भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. राखीपौर्णिमेच्या सणानिमित्त बच्चेकंपनीकडून, ताईने आपल्या आवडीची कार्टूनची राखी आणावी, असा आग्रह घरोघरी धरल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठेत रस्त्यावर दुतर्फा राखी विक्रेत्यांनी आपले छोटे-मोठे स्टॉल्स थाटले आहेत. जनरल स्टोअर्समध्येही रंगीबेरंगी राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सध्या कार्टूनच्या राख्यांना मोठी मागणी असून, त्यात टॉम अॅण्ड जेरी, अँग्री बर्ड, डोरेमॉन, यंदा नव्यानेच आलेला बाहुबली हे प्रकार आले आहेत.
खडे-मण्यांच्या आकर्षक राख्या
शहरात ठिकठिकाणी राख्यांचे स्टॉल्स लागले असून, भाऊरायासाठी राख्या घ्यायला भगिनींची गर्दी होऊ लागली आहे. यंदाही अगदी पाच रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. चमकीचे खडे-मण्यांच्या नाजूक राख्यांना महिला-मुलींची अधिक पसंती आहे. पिंपरी कॅम्प, चिंचवड बाजारपेठ परिसरात राख्यांची दुकाने आहेत. लाल-पिवळ्या-हिरव्या-निळ्या-गुलाबी-नारंगी-आकाशी अशा रंगीबेरंगी धाग्यांमध्ये रंगीत खडे-मणी-मोती गुंफलेल्या राख्यांची किंमत प्रत्येकी 10 रुपये ते 40 रुपयांपर्यंत आहे. फक्त चमकीच्या खड्यांची सुंदर रचना केलेली राखी 250 ते 400 रुपयांपर्यंत मिळत आहे.
15 ते 20 रुपयांपासून राख्या
राखी पौर्णिमेनिमित्त आपल्या भावाला आकर्षक व नवीन पद्धतीची राखी घ्यावी, याकडे महिला, मुलींचा कल दिसून येत आहे. बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. लुंबा, लटकन, भय्या-भाभी, जर्दोसी वर्क, स्टोन राखी, तसेच खास बच्चेकंपनीसाठी बाहुबली, मोटू-पतलू, डोरेमॉन, टेडी बेअर, मारियो आदी कार्टून्ससह घड्याळ, ब्रेसलेट आदी प्रकारच्या राख्यांचा समावेश आहे. दोर्यात गुंफलेल्या साध्या राख्या 15 ते 20 रुपयांपासून, तर आकर्षक कलाकुसर, साहित्य वापरलेल्या राख्या 60 रुपयांपासून पुढील किमतीत उपलब्ध आहेत.
गोंड्याची राखी कालबाह्य
पूर्वी राखीपौर्णिमेसाठी गोंड्याच्या राख्यांना विशेष मागणी असायची. परंतु आता या राख्या कालबाह्य झाल्या आहेत. गोल्डन झालर असलेल्या, मणी, मोती, रंगीबेरंगी खड्यांची डिझाईन असलेल्या राख्या आता पसंतीला उतरत आहेत. स्वस्तिक, गणपती, ओम व रुद्राक्षच्या राख्यादेखील उपलब्ध आहेत. देवाला बांधायची देव गोंडा राख्यादेखील बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.