आ.एकनाथराव खडसे यांची विधानसभेत मागणी
जळगाव – टोकरे कोळी, भामटा राजपूत व ठाकुर समाजातील रक्तनात्यात जात प्रमाणपत्र मिळालेल्यांच्या वारसांना जात प्रमाणपत्र देवून या समाजांनादेखील आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी आग्रही मागणी माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी आज विधान सभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात संख्या मोठी
आमदार खडसे म्हणाले की, राज्यभरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले. धनगर आणि मुस्लिम समाजही आरक्षणाची मागणी करीत आहेत. हे असतांना राज्यातील टोकरे कोळी, भामटा राजपूत व ठाकुर समाजाचीही संख्या मोठी आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये टोकरे कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातदेखील ही संख्या जास्त आहे. हा समाज सुरुवातीपासून आदिवासी कोळी समाज म्हणून गणला गेला आहे. काही ठिकाणी या समाजाला टोकरे कोळीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मात्र राज्यात अजूनही पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळालेला नाही. याकरिता रक्तनात्यात कुणाकडे प्रमाणपत्र असेल तर त्याचा लाभ वारसांनादेखील मिळायला हवा. हाच प्रश्न, ठाकुर व भामटा राजपूत समाजाचादेखील आहे. या प्रश्नी वारंवार पाठपुरावा केला. यावेळी रक्तनात्यात याचा लाभ देण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. तरी सरकारने याकडे लक्ष देवून तिन्ही समाजांना आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार खडसे यांनी सभागृहात केली.