मुरबाड । ठाणे जिल्ह्यातील टोकावडे पोलीस ठाण्याची स्थापना होऊन कमी कालावधीत विविध सोईसुविधा निर्माण करण्यासोबतच, घडलेल्या गुन्ह्यांची जलद गतीने उकल तसेच गुन्हा सिद्ध करण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, वायफाय सेवा, पोलीस ठाण्यात संगणकीय कामकाज आदी गोष्टींची दखल घेतया पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन देण्यात आले आहे.
कल्याणनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोकावडे हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मुरबाड तालुक्यात पूर्वी फक्त मुरबाड पोलीस ठाणे होते. मात्र, तालुक्याचा पसारा पाहता एकच पोलीस ठाणे तालुक्यासाठी अपुरे पडत होते. माळशेजघाट रस्त्यावर होणारे अपघात, घाटात होणारी वाहनांची लुटमार याचा बंदोबस्त करणे मुरबाड पोलिसांना अवघड होऊन बसले होते. त्यामुळे माजी आमदार गोटीराम पवार यांनी शासनाकडे टोकावडे येथे पोलिस ठाण्याची मागणी सतत लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन 1 फेब्रुवारी 2007 रोजी टोकावडे येथे नवीन पोलीस ठाणे सुरू झाले . दुर्गम भागात असलेल्या टोकावडेमधील या पोलीस ठाण्याला 12 वर्षे होत आहेत. या पोलीस ठाण्यासाठी स्वत:ची इमारत नाही. परंतु, ग्रामपंचायतीने बांधलेली ग्रामसचिवालयाची इमारत देण्यात आली. या इमारतीत पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर एक वर्षापूर्वी या पोलीस ठाण्याचा पदभार असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी व उपनिरीक्षक विजय धुमाळ यांनी या पोलीस ठाण्याचा कायापालट केला. त्यांच्यानंतर आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व उपनिरीक्षक सागर चौहान यांनी अनेक सुविधा पोलीस ठाण्यात निर्माण केलेल्या आहेत. पोलीस ठाण्यात कॉम्प्युटर, सीसीटीव्ही, प्रथमोपचार पेटी, शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय, जुने रेकॉर्डचे जतन, गुन्ह्यांची जलद उकल, गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणात वाढ, 1 जानेवारी ते 7 जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण 32 गुन्ह्यात 24 गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना शिक्षा झाल्याचे टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांनी सांगितले. हा सर्व गुणात्मक दर्जा पाहून या पोलीस ठाण्याला आयएसओ 9001 हे नामांकन मिळाले आहे. शुक्रवारी हे प्रमाणपत्र टोकावडे पोलीस ठाण्याला मिळाल्याचे सहाय्यक पो.नि. पोरे यांनी सांगितले.