जुन्नर । जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांनी पिकवलेले टोमॅटो संपूर्ण भारतभर निर्यात केले जातात. कीड, चिलटा या रोगांमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. टोमॅटोला बाजारभाव मिळत असूनही केवळ रोगराईमुळे हातचे उत्पन्न जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ’टोमॅटो मॉर्केट’ हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे टोमॅटो खरेदी विक्रीचे केंद्र आहे. सध्या टोमॅटोला प्रती 20 किलोला 1200 ते 1400 रुपये एवढा बाजारभाव मिळत आहे. वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकरी जरी सुखावला असला तरी पावसामुळे शेतातील मालाला फटका बसला आहे. टोमॅटोला भाव चांगला असला तरी बाजारपेठेत म्हणावी तशी आवक झालेली नाही. टोमॅटोचे उत्पादन निघत नसल्याने भांडवल कसे फिटणार, याची चिंता उत्पादकांना सतावत आहे. उन्हाळ्यात टोमॅटोचे चांगले उत्पादन निघत होते, तेव्हा बाजार भाव नव्हता. आता बाजारभाव मिळत आहे, तर टोमॅटोचे उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.