पुणे : काही ठिकाणी अतिपाऊस तर काही ठिकाणी मारलेली दडी यामुळे टोमॅटोची आवक घटली असून, सद्या प्रतिकिलो 60 रुपयांच्या घरात टोमॅटोचे दर गेले आहेत. पुणे जिल्ह्यासह देशभरातील कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश यासारख्या प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांतही टोमॅटोंची आवक घटलेली आहे. किरकोळ विक्रीचे दर तब्बल 60 ते 75 रुपये किलोवर गेले असून, येत्या काळात काही भागातून बाजार समित्यांत टोमॅटोची आवक झाली तर दर उतरतील, अशी माहिती व्यापारीवर्गाने दिली.
देशभरात 60 ते 70 रुपये प्रतिकिलोचा दर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात तेजी आलेली आहे. देशभरात असेच चित्र आहे. कोलकाता बाजारात टोमॅटो 75 रुपये किलो दराने विकले जात असून, चेन्नई व पुण्यात 60 रुपये प्रतिकिलोचा दर आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर)चे उपाध्यक्ष ए. के. सिंह यांनी सांगितले, की कर्नाटकसारख्या मोठ्या टोमॅटो उत्पादक राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे या पिकाची नासाडी झाली. तशीच परिस्थिती उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांतदेखील आहे. त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटलेले आहे. महाराष्ट्रातही काही भागात पाऊस लांबल्याने हाती असलेले हे पीक धोक्यात आहे. नजीकच्या काळात थोडीफार आवक होईल, तेव्हा भाव उतरतील, असेही सिंह यांनी सांगितले. पुण्यातील व्यापारीवर्गाशी चर्चा केली असता, बाजार समित्यांत अचानक आवक घटली असून, इतर राज्यांतून येणारा मालही येत नाही, त्यामुळे टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. सरकारी अंदाजानुसार, वर्ष 2016-17 मध्ये टोमॅटोचे एकूण उत्पादन 187 लाख टन होईल. सद्या पावसामुळे किती प्रमाणात टोमॅटो शेतीला फटका बसला याचा तूर्त अंदाज लावणे कठीण, असल्याचेही व्यापारी म्हणाले.