पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल बंद करण्याची मागणी एकीकडे होत असतानाच, याबाबतच्या करारानुसार 1 एप्रिलपासून टोलमध्ये 18 टक्के अशी घसघशीत वाढ करण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी या मार्गावरील सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांकडे अद्यापही दुर्लक्षच होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे टोलवाढीनंतरही प्रवाशांची सुरक्षा मात्र वार्यावरच असल्याची स्थिती कायम आहे.
पुणे- मुंबई द्रुतगती व जुन्या महामार्गावरील टोलच्या दरात 1 एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावरील टोलपोटीची सर्व रक्कम वसून झाल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) संकेतस्थळावरील माहितीवरून स्पष्ट होते. असे असतानाही टोल बंद केला जात नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. या बाबत न्यायालयात दाद मागण्याचाही विचार माहिती अधिकार कार्यकर्ते करत आहेत.
पावसाळ्यात द्रुतगती मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. ते रोखण्यासाठी गेल्या वर्षी या मार्गावर काही ठिकाणी संरक्षक जाळ्या लावण्याचे आणि जुन्या झालेल्या जाळ्या बदलण्याचे काम करण्यात आले. हे एकमेव काम वगळता या वर्षांमध्ये प्रत्यक्ष रस्त्यावरील धोके दूर करण्यासाठी एकही काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या मार्गावर एखादा मोठा अपघात झाला, की प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या घोषणा शासनाकडून केल्या जातात. तथापि, पुढे त्यातील काहीच केले जात नाही, असा अनुभव प्रवाशांना येतो आहे. ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त टोल मिळत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
‘ट्रामा केअर सेंटर’ रखडलेलेच
द्रुतगतीसाठी आोझर्डे गावाजवळ ‘ट्रामा केअर सेंटर’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी इमारत बांधून झाली असली, तरी प्रत्यक्षात हे केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. जखमींवर तातडीने उपचारासाठी हवाई रुग्णवाहिका सुरू करण्याची घोषणा शासनाने केली होती. प्रत्यक्षात अशा कोणत्याही हवाई रुग्णवाहिकेचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे ही घोषणाही हवेतच विरली आहे. टोलनाक्यांच्या परिसरात प्रवाशांना साधे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहेही नाहीत.
जनावरे थेट रस्त्यावर
द्रुतगती मार्ग सुरू झाल्यानंतर तो दोन्ही बाजूने सुरक्षा जाळ्या लावून बंदिस्त करण्यात आला होता. सध्या काही भागात या जाळ्या तुटल्या आहेत. त्या भागातून जनावरे व डुकरे थेट रस्त्यावर येतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. मार्गालगतच्या गावांसाठी सेवा रस्ता देण्याचीही योजना होती. मात्र, सर्वच ठिकाणी असे रस्ते नसल्याने नाइलाजास्तव ग्रामस्थांच्या दुचाकी आणि इतर वाहनेही द्रुतगतीवर मार्गावर येतात.
‘बायफेल रोप’ अपूर्णच
अपघातग्रस्त वाहन एका मार्गिकेवरून दुसर्या मार्गिकेवर गेल्याने अपघाताची भीषणता वाढल्याचे प्रकार द्रुतगती मार्गावर अनेकदा घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी दुभाजकावर बायफेल रोप लावण्याची योजना आहे. मात्र, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. लोणावळा, घाटक्षेत्र, तुंगार्ली परिसर आणि खंडाळा ते मळवली दरम्यान अद्यापही हे काम झालेले नाही.
घाटातील दुभाजक खुजेच
घाट क्षेत्रात रस्त्याची रुंदी कमी असल्याने आणि उताराचा रस्ता असल्याने ब्रेक निकामी झालेले किंवा चालकाचे नियंत्रण सुटलेले वाहन दुसर्या मार्गिकेवर येते. त्यातून इतर वाहनांनाही अपघात होतो. हे टाळण्यासाठी या क्षेत्रात दुभाजकाची उंची वाढविण्यात येणार होती. तथापि, आजही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. वळणार्या ठिकाणी ‘मेटल क्रॅश’ लावण्याचे कामही पूर्णत्वास गेले नाही.
वेगावर नियंत्रण नाहीच
वाहनांच्या अतिवेगावर नियंत्रण आणण्यासाठी ‘स्पीड गन’चा वापर करून मध्यंतरी कारवाई केली जात होती. सध्या या स्पीड गनचा वापर करून कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक नियंत्रण आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांचीही चाचणी घेण्यात आली होती. ही योजनाही ठप्प आहे.
‘गोल्डन अवर’चा अडथळा
द्रुतगती मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीवरील उपाय म्हणून ‘गोल्डन अवर’ योजनेअंतर्गत शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी जड वाहने राष्ट्रीय महामार्गावर थांबवून ठेवण्यात येतात. परिणामी महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. खालापूर, वरसोली टोलनाक्यांच्या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होते. महामार्गावर टोल भरूनही अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांत असंतोष आहे.