टोळीकडून 15 लाखांचा ऐवज जप्त

0

येरवडा । लिफ्ट देण्याचा बहाणा करून प्रवाशांना लुटणार्‍या 5 जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक करून त्यांच्याकडून 15 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.अशोक बनसोडे (34, रा़ गोंधळेनगर, मूळ. लातूर), मोहसीन पठाण (26, रा़ कोंढवा), आरबास पठाण (26, रा़. हडपसर), मुकेश चव्हाण (22, रा. सातववाडी, हडपसर), निखिल बामणे (23, रा़ जुनी वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून 14 गुन्हे उघडकीस आले असून त्याकडून 2 लॅपटॉप, 12 मोबाईल, 2 सोन्याच्या अंगठ्या, 1 सोन्याची चैन, मोटारसायकल, स्कॉडा कार, दोन बनावट नंबरप्लेट, 1 कुकरी, 1 चाकू, प्रवाशांची ओळखपत्रे असा 15 लाख 35 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे़ याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे यांनी माहिती दिली़ बनसोडे याच्याविरुद्ध लातूर, पुणे शहर व दिडोंशी याठिकाणी खून, चोरी, विनयभंग असे 8 गुन्हे दाखल होते़ बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यात बनसोडे, प्रवीण चव्हाण व बामणे हे शिक्षा भोगत असताना त्यांची ओळख झाली़ बनसोड बाहेर आल्यावर प्रवीणचा भाऊ मुकेश चव्हाण याला पुण्यात भेटला़ मुकेशने त्याला एक मोबाईल व मित्राची मोटारसायकल देऊन राहायची सोय केली़ नंतर बामणे हा शिक्षा भोगून बाहेर आला़ 16 नोव्हेंबरला ते चोरी करण्यासाठी जात असताना शिवाजीनगर येथे एका कारला चावी तशीच ठेवलेली दिसली़ चावी घेऊन नंतर रात्री त्यांनी ती कार चोरली़ तिच्यावर आर्मी असे लिहून नंबरप्लेट बदलली़ त्यानंतर ते पुणे स्टेशन येथे आले़ तेथे मुंबईला जाणार्‍या एका प्रवाशाला लिफ्ट दिली व वाटेत त्याला लुटले़ अशाप्रकारे त्यांनी गेल्या 17 दिवसांत 14 गुन्हे केले होते़ त्याची नोंद बंडगार्डन, येरवडा, हिंजवडी, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर, खेड, विरार, हडपसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहेर शिवाजीनगर येथून गाडी चोरल्यानंतर शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये ही गाडी दिसून आली़ पोलिसांनी नाशिकपर्यंत शोध घेतल्यानंतर सापुतारा घाटात त्यांनी ही गाडी सोडून दिली होती़ आपल्याला लुटल्याबद्दल पोलिसांकडे फिर्यादही दाखल केली नव्हती़ चोरट्यांकडे मिळालेल्या मोबाईलवरून पोलिसांनी फिर्यादींचा शोध घेतला़ त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़