एरंडोल। तालुक्यातील टोळी खुर्द येथे बिनधास्त व खुलेआमपणे सुरु असलेली गावठी दारूची विक्री त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की टोळी खुर्द येथे गावठी दारूची खुलेआमपणे विक्री कण्यात येत आहे. वयस्कर नागरिकांसह अल्पवयीन बालके देखील गावठी दारूचे सेवन करीत असल्यामुळे गावात दररोज किरकोळ स्वरूपात वाद होऊन भांडण होत असते.
तसेच दारू पिणार्या व्यक्ती अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ करीत असल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.तसेच गावठी दारूची विक्री करणारे गावात दादागिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. याबाबत त्वरित दाखल घेऊन गावात सुरु असलेली गावठी दारूची विक्री त्वरित बंद करून संबंधितांविरोधात कडक कारवाई करून महिलांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आमदार डॉ.सतिष पाटील यांनी देखील याबाबत लक्ष देण्याची मागणी महिलांनी केली आहे.