जळगाव। नेरीनाका परिसरातील इदगाह कॉम्पलेक्स समोर उभा केलेला ट्रक चोरट्यांनी लांबविल्यानंतर काही तासांनी ट्रकचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. बुलडाणा येथील शेख नजीर अब्दुल हकीम (वय 60, रा.देवलघाड, इकबाल चौक, बुलडाणा) हे शनिवारी बुलडाणा येथून सोयाबीनने भरलेला ट्रक घेऊन जळगावात आले होते.
सोमवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हा ट्रक लांबविला. इदगाह कॉम्पलेक्समधील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात हा प्रकार आहे. त्याने तात्काळ शेख नजीर यांना माहिती दिली. त्यानुसर शेख हे सहकार्यासोबत रात्रभर रिक्षेतून ट्रक शोधत होते. ट्रक न मिळून आल्यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार देवून परत येत असतांना रिक्षातच छातीत दुखल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. असता त्यांचा मृत्यू झाला.