ट्रकचालकाच्या प्रसंगावधानाने कारचा अपघात टळला

0

जळगाव : तालुक्यातील सावखेडा येथून लग्नसोहळा आटोपून भुसावळकडे जाणार्‍या कारला मागून येणार्‍या भरधाव ट्रकने कट मारला. या अपघातात कारचा ड्रायव्हरसाईडचा भागाचा दाबला गेला. दरम्यान ट्रकच्या ड्रायव्हरने वेळीच बे्रक मारल्याने कारमध्ये बसलेल्या कुटूंबीय थोडक्यात बचावल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.

अशी घडली दुर्घटना
जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे लग्नसोहळा आटोपून एक कुटूंबीय राष्ट्रीय महामार्गावरुन अल्टो कार क्र.(एमएच 19 ऐपी 0776) ने भुसावळकडे जात होते. याचवेळी महामार्गावरुन मागून भरधाव येणारा गॅसचे सिलेंडर भरलेल्या ट्रक (एमएच 19 झेड 5514) ने समोर चालणार्‍या अल्टो कारला कट मारला. यामध्ये कार गोल फिरुन कारची पुढची बाजू थेट ट्रकच्या समोर आल्याने ट्रकचालकाने प्रसंगवधाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे कारमध्ये बसलेले कुटूंबीय थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर कारचालक व ट्रकचालकामध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान जिल्हापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने शहर पोलीसात पोलिस ठाण्यात आणली. परंतु कारमधील कुटूंबीय व ट्रकचालकांमध्ये कोणतीही तक्रार न दिल्यामुळे व पोलिसांनी मध्यस्ती करुन वाद मिटवला.

काळ आला पण वेळ आली नाही
महामर्गावर घरघुती गॅसचे सिलेंडरने भरलेला ट्रक व कारचा अपघात झाला. यात ट्रकचालकाने प्रसंगावधाने ब्रेक मारला नसता. तर मोठा अपघात झाला असता. परंतु कारमधील कुटूंबीयांचे दैव बलत्तर असल्याने ते बालंबाल बचावले. दरम्यान आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसताच कारमधील कुटूंबीय धास्तावल्याने त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारातच रडू कोसळले. त्यामुळे काळ आला होता पण वेळ नसल्याचे बोलले जात होते.