ट्रकचालकास लुटणार्‍या दोघांना अटक

0

यवत । कोयत्याचा धाक धाकवून परप्रांतीय ट्रकचालकास लुटणार्‍या दोघा चोरट्यास यवत पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून घड्याळ, मोबाइल व टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती फौजदार अविनाश राठोड यांनी दिली आहे.हर्षद शिंदे (रा. यवत, दौंड) विनोद भागवत कांबळे (वय 20, रा कासुर्डी, दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सोनू एनुल अली शेख (वय 21, रा. उत्तरप्रदेश) या ट्रकचालकाने फिर्याद दिली आहे. ट्रकचालक शेख हा रविवारी मध्यरात्री भुलेश्‍वर फाटा येथे झोपला होता. एकाने त्याला उठवून त्याच्याकडील पैसे, मोबाइल व घड्याळ हिसकावून घेतले.

चालकाच्या खिशात पेट्रोलियम कार्ड होते, ते पाहून आरोपीने मित्राला फोन लावून टेम्पो व बॅरल घेऊन बोलविले. त्या चालकास दमदाटी करून भारत पेट्रोलियम पंपावर नेले. तेव्हा कार्डवर एक हजारच शिल्लक होते. यावर आरोपींचा विश्‍वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी शेख यांना दुसर्‍या पंपावर नेले व पेट्रोलियम कामगारास डिझेल भरण्यास सांगितले. दरम्यान शेख यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. आरोपींनी शेख यांना पुन्हा भुलेश्‍वर फाटा येथे आणून सोडले. शेख यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार टेंपो कासुर्डीच्या दिशेने जाताना दिसला पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले व टेम्पो, घड्याळ, मोबाईल हस्तगत करून आरोपींना अटक केली.