जळगाव । धुळ्यातील भाचीकडे जात असतांना पाटील कुटूंबियांच्या कारला दळवेल गावाजवळ समोरून ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना धुळ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू शुक्रवारी सकाळी उपचार घेत असतांना महिलेचा मुत्यू झाला. सायंकाळी शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. वाघनगरातील रहिवासी अनिल शालीकराम पाटील, मंदाकिनी सुरेश पाटील व सुरेश धनसिंग पाटील हे तिघेही कार क्रं. एमएच.48.ए.9918 ने धुळे येथे राहत असलेली भाचीकडे जात होते. त्यानंतर दळवेलजवळ कारमध्ये डिझेल भरल्यानंतर पुन्हा ते महामार्गावर येण्यासाठी वळण घेत असतांनाच त्यांना समोरून येणार्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. मात्र, आज शुक्रवारी सकाळी उपचार घेत असतांनाच मंदाकिनी पाटील यांचा मृत्यू झाला.