ट्रकची रिक्षाला धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

0

नागपूर : नागपूरमध्ये वरोडा शिवार येथे कळमेश्वर-सावनेर मार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुले, एक महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. हे पाचही जण रिक्षातून प्रवास करत होते. कळमेश्वर-सावनेर मार्गावरुन जाणाऱ्या भरधाव ट्रकने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. हा अपघात संध्याकाळी चारच्या सुमारास झाला.

नागपूरच्या वरोडा शिवारात चाँदशाह दर्गा आहे. या दर्ग्याच्या दर्शनानासाठी ताजबाग परिसरातील काही भाविक रिक्षाने येत होते. त्याचवेळी सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, रिक्षातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पाचही मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.