भुसावळ । प्रतिनिधी । भरधाव ट्रकने धडक दिल्याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे एएसआय रघुनाथ कळसकर यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगावच्या अजिंठा चौफुलीवर झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक चालकास चांगलेच चोपले. या प्रकरणी रात्री उशिरा जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मृत्यूने गाठले
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील कार्यरत एएसआय रघुनाथ कळसकर हे आपल्या दुचाकी (एम.एच.१९ बी.झेड.१९६१) ने अजिंठा चौफुलीकडून घराकडे जाण्यासाठी वळत असताना सुरतहून कलकत्त्याकडे जाणार्या भरधाव ट्रकने (डब्ल्यू.बी.२३२० बी.८९७९) धडक दिल्याने कळसकर यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की कळसकर यांची दुचाकी ट्रकच्या दोन्ही चाकांमध्ये फसली तर कळसकर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकचा चालक अभ्यास सुदर्शन माथूर (२५, बिहार) यास पब्लिक मार देत चांगलेच चोपून काढले. अपघाताची माहिती मिळताच जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी धाव घेतली. अपघाताला कारणीभूत ठरणारा ट्रक ताब्यात घेण्यात आला तसेच ट्रकचा चालक अभ्यास माथूर यास अटक करीत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
शोककळा
तालुका पोलीस ठाण्याचे एएसआय असलेल्या रघुनाथ कळसकर यांच्या मृत्यूने भुसावळच्या पोलीस दलात शोककळा पसरली. मयत कळसकर हे शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन कर्मचारी व जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल हेमंत कळसकर व धुळे आरटीओ कार्यालयातील कर्मचारी योगीता कळसकर यांचे ते सासरे होत. त्यांच्या अपघाती मृत्यूने भुसावळसह जळगावच्या पोलीस दलात शोककळा पसरली. मयत कळसकर यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परीवार आहे. गुरुवारी जळगाव येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.