शाहूनगरातील घटना; मयत मूळचा कोल्हापूरचा
पिंपरी-चिंचवड : भरधाव जाणार्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास शाहूनगर, चिंचवड येथे घडली. श्रेणीक हातगीने (वय 25, रा. पाटीलनगर, चिखली. मूळ रा. नांदणी, कोल्हापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, तो मार्केंटिंग क्षेत्रात कामाला होता. याप्रकरणी एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक फरार असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
कामावर जाताना काळाची झडप
श्रेणीक हातगीने हा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी होता. नोकरीसाठी तो शहरात आलेला होता. चिखली परिसरात तो वास्तव्यास होता. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघाला होता. शाहूनगरात त्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
रुग्णवाहिका पोहचली दीड तासाने
या अपघातानंतर नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली होती. परंतु, सुमारे दीड तासानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. तोपर्यंत रस्त्यावर श्रेणीकचा मृतदेह उन्हात तसाच पडून होता. अनेकांनी या असंवेदनशीलतेवर नाराजी व्यक्त केली. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी, भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.