शिरपूर । शिरपूर शहरातील कापसाचे व्यापारी कुटुंबासमवेत गुजराथ राज्यात देवदर्शनाला गेले होते. तेथून परतत असतांना गुजराथ राज्यातील बोडोली गावाजवळ त्यांच्या वाहनाला समोरुन येणार्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकास चौघे जण जागीच ठार झालेत. तर 2 गंभीर जखमी व 3 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. मयतामध्ये शिरपुरातील एस.पी.डी.एम. कॉलेजच्या प्रा. कविता चौधरी यांचा समावेश आहे.
21 रोजी दुपारी 3 ते 3.30 वाजेच्या सुमारास मार्गावरील बोडोली गावाजवळील तांदलजा गावाजवळ ही घटना घडली. 15 ऑगस्टला ध्वजारोहण करुन येथील प्रा. कविता विलास चौधरी- पाटील (33), कापसाचे व्यापारी विलास लोटन पाटील-गुजर (38) उदय विलास पाटील (15) राजनंदीनी उर्फ छकुली विलास पाटील (11) चौघे राहणार प्लॉट नंबर 38 जानकीराम नगर शिरपूर अॅड. सुनिल पुंडलिक पाटील (35), शिलाबाई सुनिल पाटील (30), यामिनी सुनिल पाटील (10), उपासना उर्फ कणक सुनिल पाटील (8) चौघे राहणार शाहु नगर (शिवाजी नगरजवळ) जळगाव असे 8जण गुजराथ राज्यात देवदर्शनासाठी गेले होते. कापसाचे व्यापारी विलास पाटील हे शहरातील जानकीराम नगरात भाड्याने खोली घेवून राहतात. त्यांनी खाजगी बोलेरो गाडी घेवून अर्थे खुर्द येथील चालक ज्ञानेश्वर काशिनाथ अहिरे (42) याला सोबत घेवून गेले होते. 21 रोजी सकाळी त्यांनी पावागडाचे दर्शन घेवून परतीला निघाले होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास मार्गावरील तांदलजा गावाजवळ समोरुचन भरधाव वेगाने येणार्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, खाजगी गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला तर समोरील ट्रकचा उजव्या बाजूकडील भाग दाबला गेला आहे.
या घटनेत प्रा. कविता चौधरी, अॅड. सुनिल पाटील, यामिनी पाटील व गाडी चालक ज्ञानेश्वर अहिरे असे चौघे जागीच ठार झालेत. तसेच या अपघातात कापसाचे व्यापारी विलास पाटील व त्यांचा मुलगा उदय पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कापसाचे व्यापारी विलास पाटील व अॅड. सुनिल पाटील हे एकमेकांचे साडू आहेत. घटनेचे ही वार्ता राजनंदीनी हिने घराजवळील राहणारे तिच्या आप्तजणांना सांगितले. त्यामुळे ते लगेच घटनास्थळाकडे रवाना झालेत. ही वार्ता कॉलनीत समजल्यानंतर अनेकांनी विलास पाटील यांच्या घरासमोर गर्दी केली. कापसाचे व्यापारी विलास पाटील हे मूळचे निम ता. अमळनेर येथील रहिवाशी असून ते व्यापार्यानिमित्त येथे आले होते. त्यांची पत्नी येथील महाविद्यालयात प्राध्यापिका होती. तसेच विलास पाटील यांचे सांडू अॅड. सुनिल पाटील हे मुळचे वरडी ता. चोपडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर मूळगावी 22 रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर चालकावर अर्थे येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. परस्पर कुटूंबातील दोन्हीकडील नातलगांचा अपघाती मृत्यू झाल्याने शिरपूर शहरात शोककळा पसरली आहे.