भुसावळ – भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने जळगावच्या दुचाकीस्वार वॉचमनचा जागीच करुण अंत झाला. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात साकेगाव गावाजवळील गॅस गोडावूनजवळ घडला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला मात्र तालुका पोलिसांनी त्यास सदगुरू पेट्रोल पंपाजवळ पकडले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात हा बळी गेल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दखल घेणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
करुण अंत
जळगाव येथील राज अॅग्रो फर्निचर या कंपनीत वॉचमन म्हणून काम करणारे नारसिंग धनसिंग भिलाला (35, मूळ रा.भाटी मांडवा पाडल्या, ता.झिरण्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) हे आपल्या दुचाकी (एम.एच.19 ए.सी.4470) ने जळगावकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक (एम.एच.16 ए.आर.8811) ने धडक दिल्याने जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला मात्र तालुका पोलिसांनी त्यास भुसावळजवळील सतगुरू पेट्रोल पंपावर ताब्यात घेतले. तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश वैद्य, गजानन काळे, राजेंद्र यांनी अपघात घडल्यानंतर धाव घेतली तसेच अवघ्या काही वेळात ट्रक चालकाच्याही मुसक्या आवळल्या. तालुका पोलिसात रात्री उशीरा ट्रक चालकाविरुद्ध प्रकाश सखाराम राठोड (देव्हारी) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
‘मृत्यूचा महामार्ग’
राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असलेल्या भुसावळ-जळगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक ते चुकवण्याचा प्रयत्न करतात मात्र यातूनच अपघात घडत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. ‘नहीं’ आणखी किती वाहनधारकांचे बळी घेणार? असा संतप्त सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत.