ट्रकच्या धडकेत तरूण ठार

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद गावापासून काही अंतरावर असलेल्या मुंजोबा मंदिराजवळ रोडवर मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रनिंगला जाणार्‍या तरुणाला उडविले. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना आज रविवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून तरुणाला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. यातच नशिराबाद पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. मात्र, घटनेनंतर चालक हा फरार झाला असल्याने त्याचा पोलिस शोध घेत आहेत. दिपक गौतम सावळे (वय 23 रा. नशिराबाद) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अशी घडली घटना
दिपक सावळे हा आगामी पोलिस भरतीच्या मैदानी सरावासाठी तो नेहमी सकाळी महामार्गाने मित्रांसोबत रनिंगचा सराव करीत होता. आज पहाटे त्याचे मित्र रनिंगसाठी येणार नसल्साने तो एकटाच घरून रनिंगला जाण्यासाठी निघाला. रनिंग करून तो घराकडे येत असतांना महामार्गावरील मुंजोबा मंदिराजवळ मागून भरधाव वेगाने येणार्‍या सीजे.04.डीए.5636 क्रमांकाच्या ट्रकने तरुणाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत तो जागीच ठार झाला. दरम्यान, दिपक हा ट्रकच्या मागच्या चाकात अडकला होता. घटनेची माहिती कळताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून दिपकला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. नाशिराबाद पोलिस व गावकर्‍यांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेण्यात आला असून चालक मात्र फरार झाला आहे.

रूग्णालयात नातेवाईकांची धाव
माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद रंधे, शुभम सपकाळे, पप्पु गालफाडे यांनी खाजगी वाहनातून दिपकला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती कळताच दिपकचे कुटुंबिय, नातेवाईक व गावकर्यांनी जिल्हा सामान्य रुणालयात दाखल घेवून हळहळ व्यक्त केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील, महाराष्ट्र स्टेट इलेक्टीसिटी वर्कर्स फेडरेशनचे विरेंद्रसिंग पाटील यांनी भेट देवून कुटुंबियांचे सात्वंन केले. यावेळी जिल्हा रूग्णालयात मयत तरूणाच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. दुपारी शवविच्छेदन करण्यात येवून दिपक याचे मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले होते. यावेळी कुटूंबियांनी एकच आक्रोश केला.

कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश
घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालात धाव घेतली. यावेळी दिपकच्या मृत्यूचे कळताच, कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा दिसून आला. मयत दिपकच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे. सायंकाळी 5 वाजता नाशिराबाद गावी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावळे कुटुंबियांवर पुन्हा ओढावले संकट
दिपकचे वडील गौतम सावळे हे एमईसीबी कर्मचारी असून दोन महिन्यापूर्वी ते काम करीत असतांना इलेक्ट्रिक पोलवरून खाली पडले होते. यात त्यांना गंभीर दुखापत होवून त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. या परिस्थितीतून सावरत असतांना दिपकच्या मृत्यूने सावळे कुटुंबियांवर पुन्हा संकट ओढावले.

अन् पोलिस बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले
दिपक हा मलकापुर येथे डी-फार्मसीचे शिक्षण घेत होता. त्याचबरोबर तो गेल्या वर्षाभरापासून पोलिस भरतीची तयारी करत होता. येत्या दोन महिन्यानंतर पोलिस भरती असल्याने त्याने स्वांतत्र चौकातील नवभारत ऍकेडमी येथे पोलिस भरती परिक्षेसाठी क्लास लावला होता. मैदानी सरावासाठी तो नाशिराबाद रस्त्याने दररोज पहाटे मित्रांसोबत रनिंग करायचा. आज पहाटे देखील तो घरून रनिंगला जाण्यासाठी निघाला होता. यातच ही दुदैवी घटना घडल्याने दिपकचे पोलिस बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. तसेच दिपक मित्रांचा लाडका व मनमिळावू स्वभावाचा होता, असे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे नशिराबाद गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गोलाणी मार्केटमधून दुचाकी चोरी
जळगाव- मारोती पेठेतील आतिष नंदलाल नांदोडे यांची गोलाणी मार्केट येथे चहाची टपरी आहे. 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता नांदोडे एमएच.19.सीई.9048 क्रमांकाच्या दुचाकीने कामावर आले होते. यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी गोलाणी मार्केटमधील शिवसेना कार्यालयाजवळील विद्युत महामंडळासमोर उभी केली होती. रात्री 9 वाजता काम आटोपून टपरी बंद केल्यानंतर नांदोडे दुचाकी उभी केल्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी चोरीला गेल्याची दिसून आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.