ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

जळगाव। कामाला जात असलेल्या तरूणाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली. ही घटना शनिवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास महामार्गावर आहूजा नगरजवळ घडली. अविनाश भानुदास धनगर (वय 24 रा.पाळधी) असे या मयत तरूणाचे नाव आहे. अविनाश हा जेसीबीवर कामावर असल्याने तो सकाळी जळगावात कामाला येत होता. अविनाश हा गावातील काका विजय संतोष धनगर यांच्या जेसीबीवर चालक म्हणून कामाला होता. जेसीबीचे काम जळगाव शहरात सुरु असल्याने तो सकाळीच पावणे नऊ वाजता जेवणाचा डबा घेऊन दुचाकीने जळगावात येण्यासाठी निघाला. महामार्गावर साई पॅलेस या हॉटेलच्या समोर मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो रस्त्यावर फेकला गेला. हा अपघात झाला तेव्हा रस्त्याने जाणारे पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांचे आरटीपीसी विजय काळे यांनी जखमीला तातडीने एका रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले.

उपचार सुरु असताना मृत्यू
अविनाश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याच्या नाकातोंडातून रक्त बाहेर येत होते. अपघाताचे वृत्त समजताच अविनाश याचे वडील भानुदास सुपा धनगर व मोठा भाऊ भुरा, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जेसीबी मालक विजय धनगर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तेथे त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच दोघं बाप-लेकांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी दोघांनी प्रचंड आक्रोश केला. प्रताप पाटील यांनी दोघांना सावरत त्यांना पाळधी येथे रवाना केले.अविनाश याच्या डोक्यात हेल्मेट नव्हते. या अपघातात त्याला फक्त डोक्यालाच मार लागला आहे, अन्य कोठेही इजा झालेली नाही. त्याच्या डोक्यात हेल्मेट असते तर त्याचे निश्चितच प्राण वाचले असते. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी महामार्गावरील साईड पट्टी व समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रताप पाटील यांनी केली.