कल्याण : डोबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 11 मी मी व्यास असलेल्या पाईपलाईनला रविवारी सकाळी एका ट्रकने धडक दिली. परिणामी पाईपचा व्हॉल्व्ह तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. या पाण्यात अनेक वाहनचालक आपली वाहने धुण्याचे काम करत होती.
सकाळी साडेसहाचे सुमारास डोंबिवलीहून कल्याणकडे ट्रक निघाला होता. अचानक त्या ट्रक चालकाचा ताबा सुटला व तो ट्रक खंबाळपाडा येथे असलेल्या पाईपलाईनवर जाऊन धडकला. त्यामुळे या पाईपचा व्हॉल्व्ह तुटला व त्याला जोडलेल्या पाईपमधून सुमारे 8 ते 10 मीटर उंच पाणी उडु लागले. सुमारे 2 तास हे पाणी वाहत होते. सर्व परिसर जलमय झाला. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने तातडीने व्हॉल्व्हची दुरुस्ती करून वाया जाणारे पाणी थांबविले. दरम्यान यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तेथील वाहन चालकांनी याचा लाभ घेऊन आपापली वाहने धुवुन घेतली. मात्र या दोन तासात हजारो लिटर पाणी वाया गेले.