ट्रकच्या धडकेत महिला मृत्युमुखी

0

हडपसर । सासवड रस्त्यावरील खड्ड्यांनी वीस दिवसांत चौथा बळी घेतला आहे. साखरपुड्याच्या समारंभावरून सासवडहून भेकराईनगरकडे जाणार्‍या दुचाकीवरील वाघले दाम्पत्याला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भेकराईनगर येथील विठ्ठल पेट्रोल पंपासमोर घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी नाथा मलाप्पा कनपट्टी (25, रा अक्कलकोट) या ट्रक चालकास अटक केली आहे.

सारिका शिवाजी वाघले (32, रा. भेकराईनगर) या महिलेचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिलेचे पती व मुलगा यशराज या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. हे दाम्पत्य वडकीनाला येथील साखरपुड्याचा समारंभ आटोपून घराकडे येत होते दरम्यान भेकराईनगर येथील ओढ्याजवळ असणार्‍या अरूंद रस्त्यावरील खड्डे चुकवित असताना पाठीमागील बाजूने येणार्‍या ट्रकने त्यांना धडक दिली. झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा पती व मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.

रस्त्याची दुर्दशा दिवसेंदिवस वाढतेय
वीस दिवसांपूर्वी बबन शिवा चव्हाण बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परत घरी येत असताना रस्ता अपघातात निधन झाले. पाच दिवसांपूर्वी मुलीच्या लग्नपत्रिका वाटत असताना अवचरे दाम्पत्याचा खड्डे चुकवित असताना मृत्यू झाला. व आज एका महिलेचा बळी गेला हे सर्व अपघात काही ठराविक अंतरावरती झालेले आहेत. येथील रस्ता हा पावसाळ्यामध्ये खड्डेमय झाला तो गेले अनेक दिवस तसाच आहे. रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जातात. मात्र येथील रस्ता रुंदीकरणाचे काम मात्र धिम्या गतीने सुरू आहे. रस्त्याची दुर्दशा दिवसेंदिवस वाढतच आहे. रस्त्यावरील खड्डे, खडी, धूळ, माती याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण या भागात पाहायला मिळते. यामुळे अनेक जण श्‍वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवित असताना अनेकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. काही महिन्यांपूर्वीच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.