ट्रकच्या धडकेत वरणगावचा दुचाकीस्वार ठार

0

वरणगाव फॅक्टरी फाट्याजवळ अपघात ः दुचाकीस्वाराच्या मृत्यूनंतर वरणगावात शोककळा

भुसावळ- भरधाव ट्रकने दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना वरणगाव फॅक्टरी फाटयाजवळ रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वारामागे बसलेला अन्य एक जणदेखील गंभीर जखमी झाला आहे. वरणगाव पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख जमील शेख मंजीत (40, रा.इस्लामपुरा नगर) व त्यांचा मित्र रवी भोई (35, विकास कॉलनी, वरणगाव) हे दोन्ही मित्र आयुध निर्माणी वरणगाव येथे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता महामार्गावरून वरणगावकडे येत असतांना अज्ञात वाहनाने भरधाव वेगात दुचाकी (क्रमांक एम.एच.19 एएस 2865) ला धडक दिल्याने शेख जमील शेख मंजीत यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला तर सोबत असलेला मित्र रवी भोई हा गंभीर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगावी हलविण्यात आले आहे.

भावाला उपचारार्थ हलवण्यापूर्वीच काळाचा घाला
शेख जमील यांचा भाऊ आजारी असल्याने त्यांना सोमवारी मुुंबईला नेले जाणार होते. उपचारासाठी पैशांची गरज असल्याने रविवारी रात्री 11 वाजता दोन्ही मित्र वरणगाव फॅक्टरी येथील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांचा अपघात झाला. शेख जमील यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच मुली, भाऊ असा परीवार आहे. वरणगाव पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वरणगाव पोलिस करीत आहेत.