चिंचवड : भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी आदित्य बिर्ला रुग्णालयासमोर झाला. सुशांत बबन शिंदे (वय 27, रा. चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संतोष नागनाथ चंदनशिवे (वय 38, रा. चिंचवड) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक प्रभूदयाळ मोहनलाल रेगत (वय 48, रा. राजस्थान) यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आणि संतोष थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयासमोरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघेही काही अंतर फरफटत गेले. यामध्ये सुशांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्याने जाणार्या नागरिकांनी दोघांना तात्काळ आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल केले. मात्र, सुशांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात संतोष देखील गंभीर जखमी झाला आहे. त्यास पुढील उपचारकामी दुसर्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.