ट्रकच्या हुलकावणीने भरधाव स्कॉर्पिओ उड्डाणपुलाखाली कोसळली

0

वाहनाचे प्रचंड नुकसान ; चाळीसगावातील चौघे किरकोळ जखमी

भुसावळ- समोरून भरधाव आलेल्या ट्रकने हुलकावणी दिल्याने भरधाव स्कॉर्पिओ कार रेल्वे उड्डाणपुलाखाली कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगावात उपचार सुरू आहेत तर वाहन मालकाने या प्रकरणी तक्रार न दिल्याने नोंद नसल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. अपघातग्रस्त वाहन चाळीसगाव बाजार समितीचे माजी सभापती अ‍ॅड.रोहिदास लाला पाटील यांच्या मालकिचे असून त्यांनी अपघाताबाबत दुजोरा देत वाहनातील कुणालाही ईजा झाली नसल्याचे सांगितले.

रेल्वे उड्डाणपुल ऐरणीवर
रेल्वे उड्डाणपुलाला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची मालिका नेहमीच सुरू असल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. चाळीसगाव येथील स्कॉर्पिओ (एम.एच.19 सी.बी. क्रमांक-377) रेल्वे उड्डाणपुलावरून जात असताना अज्ञात वाहनाने समोरून हुलकावणी दिल्याने स्कार्पिओ रेल्वे उड्डाणपुलाखाली कोसळली. बुधवारी रात्री साडेसात वाजता हा अपघात झाला, सुदैवाने या अपघातात वाहनातील कुणाला गंभीर ईजा झाली नाही मात्र वाहनातील नकुल पाटील, ललीत भिडे, राहुल जाधव, राहुल पाटील यांना किरकोळ ईजा झाली. या अपघातात स्कार्पिओचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.