जळगाव। चोरगाव शाळेतील मुख्याध्यापक धरणगाव येथून शासकीय बैठक आटोपून शनिवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घरी परतत होते. बांभोरी पुलाच्या सुरवातीला दुपारी 3.50 वाजेच्या सुमारास त्यांच्या मागून येणार्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात मुख्याध्यापकांना 20 मीटर पर्यंत फरफटत नेले. तर दुचाकी अडीच किलोमीटरपर्यंत ओढत आणली. अपघातानंतर मागून येणार्या कंपनीच्या कर्मचार्यांची पाठलाग करून वाटीकाश्रमजवळ ट्रक आडवून चालकाला चांगलाच चोप दिला. यानंतर तालुका पोलिसांनी ट्रक व चालकास ताब्यात घेत परिस्थित हाताळली.
वाटीका आश्रमजवळ अडवला ट्रक
वाघनगर परिसरातील अरूण विठ्ठल येवले (वय-50) हे धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक होते. शनिवारी सकाळी ते शाळेत गेले होते. त्यानंतर दुपारी धरणगाव येथे पंचायत समितीत असलेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीला ते गेले होते. त्याठिकाणी टॅब वाटप करण्यात आले. त्यानंतर 1 मे रोजी शाळेचा शेवटचा दिवस होता. बैठक आटोपून दुपारी येवले त्यांच्या दुचाकीने (क्र. एमएच-19-एडब्ल्यू-2329) घराकडे निघाले होते. दुपारी 3.50 वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाच्या सुरूवातीला येवले यांच्या मागून भरधाव येणार्या ट्रकने (क्र. जीजे-18-टी-9443) त्यांना धडक देऊन चिरडले. ट्रकने येवले यांना 15 ते 20 मीटर पर्यंत फरफटत नेले. त्यानंतरही ट्रक चालकाने ट्रक न थांबवता सुसाट वेगाने शहराच्या दिशेने निघाला. त्याचवेळी बांभोरी येथील कंपन्यांची शिफ्ट सुटलेली असल्याने कर्मचारी घराकडे जात होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. वाटीकाश्रमजवळ ट्रक आडवली. येवले यांची दुचाकी वाटीकाश्रम पर्यंत फरफटत आणली होती.
पाठलाग करून जमावाचा चालकाला चोप
ट्रक चालक मुकेशकुमार पटेल (वय 32, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) हा धुळे येथून कपडे धुवण्याचे साबण घेऊन खामगावकडे जात होता. त्याचवेळी त्याने हा अपघात केला. त्याचा पाठलाग करणार्या नागरीकांनी वाटीकाश्रमजवळ त्याला अडवून चांगलाच चोप दिला. त्यानंतर तालुका पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याला ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळी 150 ते 200 जणांचा जमाव जमला होता. दरम्यान, चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याने तो देखील जखमी झाला होता. वेळीच पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचत चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
अपघात झाल्यानंतर बांभोरी येथील काही पोलिस मित्रांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी येवले यांच्या खिशातील मोबाइल काढून फोन लावून त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. फोन केल्यानंतर त्यांची ओळख पटली. त्यानंतर पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश…
अपघाताची बातमी मिळाल्यानंतर येवले यांची पत्नी ललीताबाई आणि लहान मुलगा प्रज्ज्वल यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. सुरूवातीला त्यांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. काही वेळानंतर येवले यांचा मृतदेहच सिव्हीलमध्ये आला. पतीचा मृतदेह पाहून ललीताबाई यांना भोवळ येऊन त्या खाली पडल्या. तर मुलगा प्रज्ज्वल यालाही चक्कर आल्याने खाली पडला. त्याला उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले होते. कुटुंबियांनी यावेळी आक्रोश केला. त्यांचा मोठा मुलगा शिवम उर्फ शुभम हा अभियंता असून तो पुणे येथे एका कंपनीत नोकरीला आहे.