धुळे। भल्या पहाटे विना परमिट लाकडाची तस्करी करणारा ट्रक वनविभागाच्या अधिकार्यांनी पकडला असून उशिरापर्यंत या संदर्भातील चौकशी सुरु असल्याने पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. माहितीनुसार साक्री तालुक्यातून मालेगाव तालुक्याकडे खैर लाकडाची तस्करी होत असल्याची खबर मिळाल्याने वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी पाळत ठेवली होती.
पहाटे 3 वाजेच्या सुमारास साक्रीकडून आलेला एम.एच 04-सी.यु/9658 हा ट्रक कुसूंबामार्गे मालेगावकडे जात असता कुसूंब्याजवळ या ट्रकची तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये लाखो रुपये किंमतीचे खैर लाकूड असल्याचे आढळून आले. हे लाकूड निजामपूरहून कुसूंबामार्गे मालेगावकडे जात असल्याने सदरचे लाकूड नेमके कोठून घेतले व कोणाला दिले जात आहे. याबाबत ट्रकचालकाकडे चौकशी करता त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. शिवाय लाकूड वाहतूकीचा कुठलाही परवाना त्याच्याकडे नसल्याने ट्रकसह लाकूड वनविभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वाल्मिक पाटील, बाळू भामरे, काशिनाथ देवरे, बी.बी.पाटील, मुकेश सोनार यांच्या पथकाने केली. या संदर्भात तालुका पोलिसात मात्र दुपार पर्यंत कुठलीही नोंद झालेली नव्हती.