जळगाव । भाजीपाला मार्केटजवळ पार्किंगला लावलेल्या तीन ट्रकमधून अज्ञात चोरटयाने तीन मोबाईलसह 3 हजार 500 रूपये रोख असे एकुण 29 हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिरुध्द अरुण घाटगे (वय-32) धंदा मजुरी रा.वडूज ता.खटाव जि. सातारा हे 7 जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून त्यांच्या मालकीचा मालट्रक (एम.एच.11 ए.एल. 7511) या गाडीमध्ये भाजीपाला भरुन सहकारी संतोष बाळू जाधव यांच्या सोबत आपल्या ट्रकने जळगाव येथील भाजीपाला मार्केटमध्ये आले. दि.8 रविवार रोजी आपल्या मालट्रक मधील भाजीपाला उतरवून अनिरुध्द यांनी त्यांची ट्रक रवी रोडवेज या ट्रान्सपोर्ट समोरील मोकळ्या जागेत पार्कींग केली. या मोकळ्या जागेत मालट्रक (एम.एच.11 ए.एल.3624) वरील ड्रायव्हर अमोल जगन्नाथ अवताडे रा. लिंपनगाव ता. श्रीगांदा जि. अहमदनगर, तसेच मालट्रक क्रमांक (एम.एच18 ए.ए.7339) वरील ड्रायव्हर इम्रान शेख तुराफ रा.बंदे नवाज कॉलनी, सार्वजनिक हॉस्पीटल मागे, धुळे व मालट्रक (एम.एच.19 झेड 5499) वरील चालक शेख इम्रान शे.रहेमान रा. मुक्ताईनगर, अल्फला हायस्कुल जवळ मुक्ताईनगर जि. जळगाव यांनी त्यांच्या मालट्रक याच मोकळ्या जागेवर रवी रोडवेजमध्ये झोपले होते. सकाळी अनिरुध्द यांना जाग आल्यावर ते आपल्या ट्रकमध्ये ठेवलेला मोबाईल घेण्यासाठी गेले असता ट्रकचा ड्रायव्हर साईडच्या खिडकीचा काच काढून बाजूला ठेवलेला दिसून आला. त्यामुळे त्यांनी आपला मोबाईल पाहिला असता मोबाईल आढळून आला नाही. तसेच त्या मोबाईलवर दुसर्याच्या मोबाईलवरुन फोन केला असता फोन देखील लागत नसल्याचे समजले. त्यांनी रवी रोडवेज मध्ये झोपलेले ड्रायवर यांना विचारणा केली असता त्यांनी देखील आपआपले मोबाईल गाडीत जाऊन चेक केले असता त्यांचेही मोबाईल चोरीस गेल्याचे दिसून आले व त्यांच्याही गाड्याच्या खिडक्यांचे काचा काढल्याचे आढळून आले. त्यानंतर अनिरुध्द व इतर गाड्यांच्या चालकांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले असून आपले मोबाईल चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली असता अनिरुध्द यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द 14 हजार रुपये किमतीचा सॅमसंग- 7 मॅक्स, 5 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग ओन-45 व 7 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा काळयारंगाचा मोबाईल आणि 3 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरीला गेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.