जळगाव । महामार्गांवर धावणार्या अनेक ट्रकांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जातो. या अवैध अवजड वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. या समस्येवर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल शाखेतील विद्यार्थ्यांनी उपाय शोधला आहे. त्यांनी तयार केलेल्या सर्किटमुळे वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरला तर अलार्म वाजतो. तसेच सुरू गाडी बंद होत नाही बंद गाडी सुरू होत नाही.
अपघातावर बसणार आळा
नियमानुसार जास्त माल भरल्यास दोन हजार रुपयांपर्यंत दंड आहे. तरीदेखील वाहनधारकांकडून हा नियम सर्रासपणे मोडला जातो. त्यामुळे देशभरात दिवसाला सुमारे 300 अपघात होत असतात. या अपघातांना आळा बसावा म्हणून विद्यार्थ्यांनी तंत्रशुद्ध पद्धत शोधून एक सर्किट तयार केले आहे.
सर्कीटसाठी 7 हजार रूपये
वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्यास अलार्म वाजतो. तसेच चालू वाहन सुरू होत नाही किंवा सुरू केलेले वाहन बंद होत नाही. त्याचबरोबर अतिरिक्त माल भरल्याचा संदेश वाहनचालकाला समोरील डॅशबोर्डवर (स्क्रीनवर) दिसतो. भार कमी केल्यानंतर वाहन पुन्हा सुरू किंवा बंद होते. आरटीओ कार्यालयासाठी हे सर्किट खूप उपयोगी ठरणार आहे. सर्किट तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सात हजार रुपये खर्च आला आहे. त्यांना प्रा.एन.एस. महाजन, विभागप्रमुख डॉ.पी.जे.शाह, डी.एस.पाटील, डॉ.पी.व्ही. ठाकरे, व्ही.एस. पवार, एस.एम. शेमबेकर, एम.एम.अन्सारी मार्गदर्शन केले.