पिंपरी : वेगातील ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात ट्रक पलटी झाला. यामुळे सकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हा अपघात सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मालवाहतूक ट्रक (के ए 32 / सी 6381) पुण्याहून निगडीच्या दिशेने निघाला होता. पावणेसातच्या सुमारास निगडी मधील पवळे उड्डाणपुलावरून जात असताना उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक उलटून दुस-या लेनमध्ये जाऊन पडला.
हे देखील वाचा
या अपघातामुळे निगडीहून पिंपरीच्या दिशेने जाणारी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. ट्रकची पुढची दोन्ही चाके निखळली आहेत. त्यामुळे ट्रक बाजूला करण्यात काही अडचणी येत आहेत. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. पुलावरील एका लेनची वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या आहेत. काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून कोंडी सोडविण्याचे काम सुरू आहे. तर भक्ति शक्ति चौकातुन वाहतूक वळविण्यात आली आहे.