भुसावळ शहरातील साईजीवन सुपर शॉपसमोरील घटना ; अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार
भुसावळ- भरधाव ट्रक अॅपे रीक्षावर आदळून झालेल्या अपघातात अॅपेतील सात प्रवासी जखमी झाल्याची घटना शहरातील यावल रोडवरील साईजीवन सुपर शॉपजवळ शनिवारी सकाळी 10 वाजता घडली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अपघातानंतर ट्रक चालक पसार
यावल तालुक्यातील चिखली येथून प्रवासी भरून घेवून येणारी अॅपे (एम.एच.19 ए.ई. 8931) भुसावळकडे येत असताना यावल रोडवरील साईजीवन शॉपजवळ आल्यानंतर पाठीमागून कडधान्य घेवून जाणार्या भरधाव ट्रक (एम.पी. 09 एच.जी. 0981) ने अॅपेला पाठीमागून धडक दिल्याने एक प्रवासी रीक्षाबाहेर फेकला गेला तर अन्य सहा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मुका मार बसला. पादचार्यांसह एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी जखमींना तत्काळ साईपुष्प हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केल्याने डॉ.नीलेश महाजन यांनी जखमींवर तात्काळ उपचार केले. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावर थांबून असलातरी चालक मात्र वाहन सोडून पसार झाला. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी, महेंद्र ठाकरे, सलीम तडवी, संदीप राजपूत आदींनी रुग्णालयात धाव घेत जखमी रुग्णांची चौकशी केली.
अपघातात सात जण जखमी
अपघातात मिराबाई विलास तायडे (44, रा.चिखली बुद्रूक), शांताराम लक्ष्मण महाजन (50), प्रकाश सोनू जाधव (60), दुर्गा जाधव (50), रूपाली गोकूळ पाटील (13), सुरेखा गोकूळ पाटील (55) तसेच अॅपे रीक्षा चालक लखन तायडे हे जखमी झाले.