ट्रक उलटून 1 ठार, 30 जखमी

0

बहादारपूर-पारोळा रस्त्यावरील घटना


पारोळा : बहादारपूर-पारोळा रस्त्यावर आयशर उलटून एकजण ठार, तर 30 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 22 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत. ही घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

धुळे येथील आयशर ट्रकमधून (एमएच-18 – 5535) 40 ते 45 प्रवासी जात होते. बहादरपूर येथे वीरांच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. कार्यक्रम आटोपून आयशर ट्रक परतीच्या मार्गावर असताना सायंकाळी पाचच्या सुमारास मोंढाळे गावाजवळील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यात ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात चिंधा बाबूराव रणदिवे (वय 50) हे जागीच ठार झाले. तर राज अनिल माळी (वय 12, धुळे), पूना संभाजी माळी (वय13, धुळे), अंशुमन सुदाम महाजन (वय 9, सुरत), हिराबाई देविदास माळी (वय 40, धुळे), शुभम राजेंद्र परदेशी (वय 16, धुळे) वसंत बाबुराव खैरनार (वय 52, धुळे), मीना वसंत खैरनार (वय 42, धुळे), रवींद्र शाळीग्राम पाटील (वय55, धुळे), सुकलाल शंकर महाजन (वय60, धुळे), सुदाम बाबूलाल सोनवणे (वय32, सुरत), देविदास दामू बडगुजर (वय70, धुळे), पंडित शंकर माळी (वय 72), जातीम प्रकाश माळी (वय14), गुलाब महाजन (वय 60, मंदाणे), वैशाली प्रदीप महाजन (वय32, सेंधवा), शीतल कैलास माळी (वय28, सुरत) विनिता प्रदीप महाजन (वय 10), कुणाल प्रदीप महाजन (वय 9) यांना डोक्यास जबर मार लागला. त्यांना लागलीच पारोळा कुटीर रुग्णालयातून धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. इतरांना दुखापत झाली नसून, त्यांची नावे मिळू शकली नाहीत.

कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप

घटना ज्याठिकाणी झाली त्या भागात विशेष नागरिकांची वस्ती नव्हती. परंतु मोंढाळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्यात हातभार लावला. यावेळी रुग्णवाहिका चालक रोशन पाटील, प्रसाद राजहंस, राजेंद्र वानखेडे, नंदू लोहार, शेख महताफ, शेख कुरेशी यांनी कुटीर रुग्णालयात जखमींना आणले. यावेळी जखमींवर डॉ. सुनील परोचे, डॉ. राहुल जैन, परिचारिका सरला पवार, दीपक सोनार, अजय घटायडे यांनी प्रथमोपचार करत गंभीर चार जखमींना धुळे येथे हलविले. यावेळी घटनेचे वृत्त कळताच रुग्णांच्या नातवाईकांनी कुटीर रुग्णालयात धाव घेतली. पो. नि. लीलाधर कानडे यांनी घटनास्थळी भेट देवून कुटीर रुग्णालयात धाव घेतली होती. याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु होती.