ट्रक चालकाला लुटणारे आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या नजरेत

0

भुसावळ- माडवी येथून केमिकल पावडर भरून रायपूरकडे जाणार्‍या ट्राला चालकाला दुचाकीला कट का मारला, असे म्हणत दोघांनी अडवून मारहाण करत त्याच्याकडील नऊ हजार 500 रुपये, मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास भुसावळ मार्गावर घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चालकाने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू केली आहे. दुचाकी क्रमांक व आरोपींच्या वर्णनानुसार लवकरच आरोपी पकडले जातील, असे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले. गुजराथ राज्यातील माडवी येथून रायपूरकडे जाणारा 22 चाकांचा ट्राला (सीजी 04 एमए 7725) रविवारी मध्यरात्री नाहाटा चौफुलीकडून वरणगावकडे जात असताना हॉटेल तनारीकाच्या पुढे मोटार सायकलवर आलेल्या दोघांनी ट्राला अडवत केबिनमध्ये चढत चालक अजयकुमार शैलेंद्रकुमार तिवारी (रा. भिलई, छत्तीसगड) यांच्याशी वाद घालत त्यांच्या खिशातील 9 हजार 500 रुपये, मोबाइल हिसकावून पळ काढला होता. बाजारपेठ पोलिसांनी आरोपी व दुचाकींच्या वर्णनानुसार आरोपींना ओळखले असून लवकरच ते गजाआड होतील, असा विश्‍वास पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी व्यक्त केला.