बाजारपेठ पोलिसांची कामगिरी ; दोघा पसार आरोपींचा कसून शोध
भुसावळ– ट्रक चालकाला अडवून त्यास धमकावत लुटीचा प्रयत्न सुरू असतानाच बाजारपेठ पोलिसांचे गस्त वाहन धडकल्याने आरोपी पसार झाले मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून दोघांच्या मुसक्या आवळल्या तर अन्य दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. या घटनेत यश सुनील गायकवाड (18, सरस्वती नगर, वरणगाव) व मनोज अजय जाधव (20, कैकाडी वाडा, रामपेठ, वरणगाव) यांना अटक करण्यात आली असून त्यांचे साथीदार भैय्या निकम उर्फ योयो व दादु उर्फ बदानी (दोघे रा.वरणगाव, नाव पूर्ण माहित नाही) हे पसार होण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
गस्त वाहन धडकल्याने लूट टळली
ट्रक चालक रामदास महादेव पळसकर (45, व्याळा, ता.बाळापूर, जि.अकोला) हे क्लिनर कैलास वाहुकारसह (एम.एच.30 एबी 2466) ने वरणगावकडे निघाले असताना रूप टाईल्ससमोर 30 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करीत पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बाजारपेठचे उपनिरीक्षक मनोज पवार हे चालक बंटी कापडणे व होमगार्ड शेख यांच्यासह गस्तीवर असताना त्यांना रूप टाईल्ससमोर वाहनाजवळ कुणीतरी पळत येत असताना दिसल्याने त्यांनी त्याची चौकशी केली असता लुटीचा प्रकार समोर आला व पोलीस वाहनाच्या आवाजाने आरोपी वरणगावकडे पळाल्याचे सांगितल्यानंतर आरोपींचा महामार्गावरून पाठलाग सुरू केल्यानंतर फेकरी रेल्वे गेट बंद असल्याने दोघा आरोपींना पकडण्यात यश आले तर अन्य दोघे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. आरोपींना पकडण्याकामी बाजारपेठचे सुधीर विसपुते, प्रवीण ढाके यांनीही सहकार्य केले. दरम्यान, अटकेतील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून चौकशीत काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे