ट्रक चॅसी धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा अंत

0

पिंपरी-चिंचवड : आकुर्डी येथील म्हाळसाकांत चौकाजवळ ट्रक चॅसीच्या धडकेत अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरील एका तरुणाचा जागीचा करूण अंत झाला. आशीष दीपक पाऊसकर (वय 18, रा. शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे त्याचे आहे. तो सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिकत होता. अपघातात दुचाकी चालविणारा त्याचा मित्र थोडक्यात बचावला. या प्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. आशीषचा चारच दिवसांपूर्वी वाढदिवस झाला असून यानिमित्त त्याने नवी मोटारसायकल घेतली होती. मात्र, सकाळी ती एका मित्राने नेल्याने दुसर्‍या मित्राच्या स्कूटरवरून महाविद्यालयाला जात असतानाच हा अपघात झाला. वाढदिवस आणि नव्या मोटरसायकलच्या सेलिब्रेशनचे रंग ताजे असतानाच काळाचा घाला पडला, अशी प्रतिक्रिया धाय मोकलून रडणारे त्याचे मित्र व शेजारी व्यक्त करत होते.

जागीच अंत
आशीष सकाळी पावणे नऊला कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. त्याला नेण्यासाठी त्याचा मित्र अ‍ॅक्टिव्हा स्कूटर (एम एच 14 एआय 8748) घेवून आला होता. मित्र गाडी चालवत होता. दोघेही खंडोबा चौकातून म्हाळसाकांत चौकाकडे जात होते. त्याचवेळी त्यांच्यापुढे नवीनच चासी ट्रक निघाला होता. त्याला डाव्या बाजूने ओलांडून पुढे जात असताना स्कूटर थोडी आत सरकली आणि ट्रकच्या बॅटरी बॉक्सला हलकीशी धडकली. यामध्ये आशीष रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला दुखापत होवून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यातच त्याचा जागीच अंत झाला. तर स्कूटर चालवत असलेल्या मित्राला किरकोळ जखम झाली. अपघात इतक्या क्षणात घडला की आशिषला रुग्णालयात नेण्याचीही उसंत कोणालाही झाली नाही.

आकुर्डीतील कुटूंब
गुणी, शांत असणारा आशिष हा आकुर्डी येथील शुभश्री सोसायटीमध्ये आई-वडील व लहान भावासोबत राहतो. पाऊसकर कुटुंब मुळचे गोव्याचे असून नोकरी व मुलांच्या शिक्षणासाठी ते आकुर्डी येथे स्थायिक झाले आहेत. त्याचे वडील मुंबईमध्ये एका कंपनीत अभियंता, तर आई चिंचवडच्या नॉवेल इन्स्टीट्यूटमध्ये शिक्षिका आहेत. आशिष ताथवडे येथील इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता.

पाच दिवसांपूर्वी वाढदिवस
आशीशचा वाढदिवस 26 ऑक्टोबरला झाला. यानिमित्त घरच्यांनी त्याला अव्हेंजर ही मोटारसायकल घेवून दिली होती. यानिमित्त पेढे अगदी बुधवारपर्यंत सोसायटीमध्ये तो वाटत होता. प्रत्येकाला काका मी नवीन गाडी घेतली, असे सांगून घरी जाऊन पेढे देत होता. आज सकाळीच तो सोसायटीच्या पार्किंगमध्ये शेजारच्या काकांना बोलून निघाला होता. मात्र, मित्र गाडी घेऊन आला म्हणून त्याने स्वतःची गाडी न घेता मित्राच्या गाडीवर कॉलेजला गेला. मात्र, अवघ्या तासाभरात हा अपघात झाला. त्याच्या या स्वभावामुळेच सोसायटीमधील प्रत्येकाला त्याच्या जाणाने धक्का बसला आहे.

नागरिकांची नाराजी
म्हाळसांकात चौकात यापूर्वीही अनेकवेळा अपघात होवून काहींचे जीव गेले आहेत. यावेळी उपस्थितांनी वाहतूक पोलिसांची हलगर्जी, बंद पडणारी सिग्नल व्यवस्था याबाबत नाराजी व्यक्त केली. या परिसरात शाळा, महाविद्यालये व रहदारी असतानाही प्रशासनाकडून म्हणावी तशी सुरक्षा व्यवस्था पुरवली जात नाही. जड वाहनेही सर्रास या परिसरात वाहतूक करताना दिसतात. त्याचाच परिणाम म्हणून असे अपघात होत असल्याचा आरोप नारिकांनी केला.