धुळ्यासह अहमदाबादेतील पाच जणांना अटक ; धुळ्यासह मालेगावात ट्रक चोरल्याची कबुली
धुळे– निर्जन जागी उभ्या असलेल्या ट्रक रात्रीतून चोरून त्यांची विल्हेवाट लावणार्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात धुळ्यतील चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक एम.रामकुमार व अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांच्या टोळीला पकडण्यात आले असून आरोपींनी धुळ्यासह मालेगावातून तीन ट्रक चोरीची कबुली दिली असून आणखी काही चोर्या उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
असा झाला चोरीचा उलगडा
धुळे शहरातील रहिवासी अंनिस शहा नसीर शहा यांच्या मालकीची दहा चाकी ट्रक (एम.एच.18 बी.जी.3666) 30 डिसेंबर 2017 रोजी शंभर फुटी रस्त्यावर लावली असताना चोरट्यांनी रात्रीतून लांबवली होती. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात ट्रक चालक समीर शहा रफिक शहा (20, अजमेरा नगर, धुळे) याने हा ट्रक लांबवल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस खाक्या दाखवताच त्याने टोळीचा उलगडा गेला.
चोरलेल्या ट्रकांची डाभोईत विल्हेवाट
पोलीस चौकशीत आरोपींची साखळी उघड झाल्यानंतर त्यांनी चोरी केलेल्या ट्रका रात्रीतून ते गुजरात राज्यातील डाभोई (जि.अहमदाबाद) येथील कपडा व्यापारी मीर जियाउर रहेमान मीर रियाजुल रेहमान सय्यद (36, इब्राहीम मशीदीजवळ, कॅनल सरखेज, जि.अहमदाबाद) यांच्याकडे विल्हेवाट लावत असल्याचे उघड झाले. सुरुवातीला मीर जियाउर रहेमानने ‘तो मी नव्हेच’ ची भूमिका घेतली मात्र पोलीस कोठडीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने मालेगावच्या पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील ट्रक (एम.एच.41 जी.6394) व धुळे येथील ट्रक (एम.एच.18 बी.जी.3666) व (एम.एच.18 के.0898) या चोरीच्या ट्रकची खरेदी केल्याची कबुली दिली.
या आरोपींना झाली अटक
समीर शहा रफिक शहा (20, अजमेरा नगर, खडी पट्टी, धुळे), सोहेल आसीफ अन्सारी (19, जामचा मळा, शंभर फुटी रोड, कोंबडी फार्मजवळ, धुळे), रिझवान रहिम शेख (23, आयशा नगर, खडी पट्टी, धुळे), मोसीन सलीम शेख (24, गरीब नवाज नगर, बुशरा हॉटेलजवळ, धुळे), मीर जियाउर रहेमान मीर रियाजुल रेहमान सय्यद (36, इब्राहीम मशीदीजवळ, कॅनल सरखेज, जि.अहमदाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. पापा गोल्डन (इम्रान), अण्णा (जहूर काल्या) या आरोपींचा शोध सुरू आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक एम.रामकुमार व अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सागर आहेर, राजेंद्र इंदवे, शंकर महाजन, संदीप कढरे, प्रेमराज पाटील, जोएब पठाण, सुशील शेंडे आदींनी ट्रक चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या.