मुक्ताईनगर : तालुक्यातील घोडसगाव आणि संत मुक्ताई शुगर एनर्जी प्रा.लि.च्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रक व ट्राला यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ट्रकमधील दोन जण ठार झाले. ही घटना सोमवारी रात्री 8:30 वाजता घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, घोडसगाव आणि साखर कारखानाच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्राला (क्र. GJ 01 DY 2237) वरील चालक (नाव गाव माहिती नाही) याने बेजबाबदारपणे वाहन भरधाव चालवित ट्रक (क्र. MH 27 X 7605) ला समोरून जोरदार धडक दिली. यात ट्रकमधील शे.रिजवान शे. रऊफ व अब्दूल शहजान अब्दूल (दोघे रा. काटेपूर्णा, ता.जि. अकोला) हे जागीच ठार झाले. याप्रकरणी ट्रकचालक मो. शकील मो. शरिफ (रा. गुलिस्तानगर, जि. अमरावती) यांच्या फिर्यादीवरुन ट्राला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत.