ट्रक थांबवून डिपीतून तिनशे लिटर ऑईल चोरी!

0

जळगाव । औद्योगीक वसाहतीच्या ई-सेक्टरमधील कारखान्यांना विद्युतपुरवठा सुरू असतांना चोरट्यांनी चक्क ट्रक लावुन डीपीतून तिनशे लिटर ऑईल चोरी केल्याची घटना घडली. पुरवठा सुरु असतांना रिकामी झालेली डिपी काही मिनटातच आतून जळून गेल्याने पुरवठा बंद झाला. अचानक लाईट बंद झाल्याने कंपनीतील कामगाराने बाहेर येवुन डीपीकडे पाहिल्यावर त्याला चोरीचा संशय आला. पोलिसांना कळवल्यावर औद्योगीक वसाहत पोलिसांनी ट्रकवरील क्लिनरला रंगेहात अटक केली असुन चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला.

डिपीला नळी लावून ऑईल चोरी: औद्योगीक वसाहत परिसरातील ई सेक्टर भागात सुदर्शन ईलाईट इंडस्ट्रीज समोर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास विद्युत डीपीजवळ ट्रक लावून डीपीतील ऑईलची चोरी करण्यात आली. पुर्णक्षमतेने विद्युतपुरवठा सुरू असतांना चोरट्यांनी थेट डीपीलाच नळी जोडून तीनशे लिटर ऑईल खाली करुन घेतले. टाकी भरून पळण्याच्या तयारीत असतांनाच डीपीजळून पुरवठा खंडीत झाल्याने कंपनीतील कामगाराने बाहेर येऊन पहाणी केली. त्याला चोरीचा संशय आल्याने तत्काळ पोलिसांना कळवल्यावर सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, राजेंद्र ठाकरे, सुनील पाटील, आसीम तडवी अशांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीसांची घटनास्थळी धाव
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर ट्रक सहित, त्याच्यावरील क्लिनर जगदीश प्रसाद देवीप्रसाद याला अटक करण्यात आली. एमईसीबी अधिकारी प्रमोद रामदास तायडे यांच्या तक्रारीवरुन औद्योगीक वसाहत पोलिसात दोघांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन् विद्यूत पुरवठा खंडीत
ऐरवी शनिवारी सर्व कंपन्या बंद असतात, मात्र रात्रपाळीला एकदोन ठिकाणी ओव्हर टाईमची कामे सुरु असतात. रात्रपाळीच्या कामाचे काही तास शिल्लक असतांनाच अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पहाटे अडीच वाजता कर्मचारी डीपीकडे आला, मात्र त्याला वेगळाच प्रकार दिसल्याने त्याने तत्काळ कंपनी मालक व पोलिसांना फोन करुन घटना कळवली. दरम्यान पळून जाण्याच्या तयारीत अतसांना ट्रक थांबवुन तिच्या पुढची काचही कामगाराने दगड व काठी मारल्याने फोडली गेली. पोलिसांनाही सुरवातीला किरकोळ आईल चोरी वाटले मात्र घटनास्थळावर गेल्यानंतर प्रकरण पाहुन पोलिसही अवाक झाले.